शरद पवार यांच्याकडे वर्णी लावा, शिवसेना नेता सतत करत होता मागणी, कुणी केला मोठा गौप्यस्फोट?
शिवसेनेचा एक मोठा नेता आपल्या घरी सतत यायचा. राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडे माझी वर्णी लावा अशी सतत विनंती करत होता. मात्र, त्याला आहे तिथेच रहाण्याचा सल्ला दिला होता असा मोठा गौप्यस्फोट एका आमदाराने केला.
मुंबई : शिवसेने – भाजप युती सरकारमध्ये त्यांना मंत्री बनविण्यात आले. वडिलांना विधान परिषदेत आमदार बनवलं. तर मुलाला विधानसभेची उमेदवारी देऊन त्यालाही आमदार केलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यामुळे हा नेता नाराज झाला होता. त्याची पावले राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वळत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी तो नेता इच्छुक होता. त्यासाठी तो नेता सतत आमच्या घरी यायचा. राष्टवादीमध्ये घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडे माझी वर्णी लावा अशी विनंती करायचा असा गौप्यस्फोट एका आमदाराने केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील घनिष्ट संबधामुळेच राज्यात महाविकास आघाडीचा नवा पर्याय उभा राहिला. याच महाविकास आघाडीने भाजप दूर सारत राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आणि 50 आमदार. अनेक नेते, पदाधिकारी गेले. यात शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचा मुलग दापोलीचा आमदार योगेश कदम यांचाही समावेश होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सातत्याने टीका केली.
शिवसेनेच्या वर्धापनदिना निमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यात रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याला संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. रामदास कदम यांनी संजय राऊत यांना निष्ठा शिकवण्याची गरज नाही.
रामदास कदम हे शिवसेनेत होते त्यावेळी ते आमच्या घरी यायचे. राऊत साहेबांकडे माझी राष्ट्रवादीत शरद पवारांकडे वर्णी लावा म्हणजे माझं बस्तान चांगलं बसेल अशी विनवणी रामदास कदम करायचे.
वेळोवेळी घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विनंती केली. परंतु, संजय राऊत यांनी रामदास कदम यांना सेनेतच राहण्याचा सल्ला दिला असा गौप्यस्फोट आमदार सुनील राऊत यांनी केला.