राजकारणासाठी मोदी शिवाजी महाराजांचे नाव घेतात, मग बेळगावमध्ये तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा का ? संजय राऊतांचा हल्ला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी या तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. राजकारण करायचं असेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांचे नाव घेतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांच्यासोबत राहिलं तर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो, हे चालणार नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
निषेध करणे म्हणजे भाजपशासित राज्यांमध्ये तो देशद्रोह असतो का ?
“देशात देशद्रोह अतिशय स्वस्त झाला आहे. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेमुळे अनेक ठिकाणी लोकांनी आंदोलने केली. बेळगावातदेखील आंदोलन झाले. त्यांच्यावर कारवाई करता येईल. मात्र 40 ते 38 तरुणांवर कर्नाटकमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांची विटंबना झाल्यानंतर निषेध करणे म्हणजे भाजपशासित राज्यांमध्ये तो देशद्रोह असतो का ? महाराष्ट्र सरकारने ही बाब गंभीरतेने घ्यावी. राजकारण करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमध्ये जाऊन शिवाजी महाराजांचे नाव घेतात. मात्र जे लोक शिवाजी महारांसोबत राहतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. हे चालणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका
तर दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामनाच्या अग्रलेखातही कर्नाटक पोलिसांचा निषेध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अग्रलेखात महाराष्ट्र सरकारवरदेखील टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी या विषयाकडे पोटतीडकीने पाहायला हवे. महाराष्ट्र सरकार तरी या प्रश्वावर काय करत आहे ? बेळगावमध्ये तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा आणि येथील सरकारने अंग चोरून बसायचे, हे बरे नाही, अशा शब्दात सामना अग्रलेखाद्वारे राज्य सरकारला खडसावण्यात आले आहे. तसेच बेळगावातील 38 तरुणांच्या लढ्याने रायगडास जाग आली असेल पण मराठी आणि शिवप्रेमी सरकारचे मन द्रवेल काय ? असा सवालदेखील सामना अग्रलेखात विचारण्यात आला आहे
बेळगावमध्ये नेमकं काय घडलं ?
बेळगावातील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर बेळगावात धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध केला होता. या मराठी भाषिक तरुणांवर देशद्रोहासाठी लावण्यात येणारे भारतीय दंड संहितेचे 123 (अ) हे कलम लावण्यात आले आहे. या कलमांतर्गत मराठी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडेबाजार पोलीस स्थानक, कॅम्प पोलीस स्थानक ,टिळकवाडी पोलीस स्थानक व मार्केट पोलीस स्थानकामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण 38 मराठी भाषिकांना अटक करून कारागृहात टाकले आहे. तर 23 हून अधिक जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इतर बातम्या :