आमदार दिलीप लांडेंनी नालेसफाई कंत्राटदाराला बसवलं नाल्यातील कचऱ्यावर, शिवसैनिकांनीच केली नालेसफाई
आज शिवसेनेचे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाईच्या कंत्राटदाराला चांगलाच हिसका दाखवलाय.
मुंबई : नालेसफाईच्या मुद्द्यावरुन मुंबईत सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरु आहे. नालेसफाईबाबतचा महापालिकेचा दावा कसा फोल आहे, हे भाजप आमदार आशिष शेलार आणि अतुल भातखळकर वारंवार सांगत आहेत. तर महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे नेते नालेसफाई योग्य रित्या झाल्याचा दावा करत विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाईच्या कंत्राटदाराला चांगलाच हिसका दाखवलाय. (ShivSena MLA Dilip Lande aggressive on Nalesafai contractor)
आपल्या मतदारसंघातील नालेसफाईची पाहणी दिलीप लांडे यांनी आज केली. त्यावेळी नालेसफाई योग्यरित्या झाली नसल्याचं सांगत त्यांनी नालेसफाई कंत्राटदाराला चक्क नाल्यातील कचऱ्यावर बसवलं. इतकंच नाही तर या कंत्राटदाराच्या अंगावर नाल्यातील कचराही टाकला. त्यानंतर नालेसफाई कशी केली जाते हे सांगण्यासाठी शिवसैनिकांनी नाल्यातील कचरा आणि गाळ काढला. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईवर अमाप खर्च केल जातो. मात्र, योग्यरित्या नालेसफाई होत नसल्याचं नाल्या तुंबल्याचं, नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवर, अनेकांच्या घरात घुसल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. अशावेळी दिलीप लांडे यांनी नालेसफाई कंत्राटदाराला दाखवलेल्या हिसक्याची आता चांगलीच चर्चा होत आहे.
नालेसफाईवरुन शेलारांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल
मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाचं बेटं तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडं-झुडपं अभी आहेत. 100 टक्के नालेसफाईचा दावा हा बिलं काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरु झालं आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहे. पी. वेलारासू नावाचा राक्षस पालिका अधिकारी म्हणून फिरत आहे. तो आ वासून स्वत:ची वाहवा करत आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचं त्याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय. तसंच यांना मुंबईकरांसमोर उघडं करणं हे भाजपचं काम असल्याचं शेलार म्हणालेत.
नालेसफाईबाबत मुंबई महापालिकेचा दावा
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंगळवारी मुंबईतल्या विविध एजन्सीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्यानंतर पालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व कामांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे 104 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत 3 लाख 24 हजार 284 मॅट्रिक टन इतका गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या मुदतीत म्हणजे मे अखेरीपर्यंत ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे, असं पालिकेने म्हटलं होतं.
Monsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा https://t.co/phAvbYNEEX @Hosalikar_KS @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #Monsoon2021 #mumbairain #RainForecast #WeatherUpdate #Maharashtra #IMD #rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2021
संबंधित बातम्या :
Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!
सचिन वाझे आणि नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी
ShivSena MLA Dilip Lande aggressive on Nalesafai contractor