“मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘तो’ पुतळा बनवणारे ठेकेदार शिंदेंच्या मर्जीतले”, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
महाराष्ट्राच्या छातीत आरपार जी वेदना झाली आहे, त्याची भरपाई कोणीही करु शकणार नाही. महाराजांच्या पुतळ्यांचे ज्या प्रकारे तुकडे झालेले पाहिले, अशी वेळ महाराष्ट्रावर कधी येईल, असे आम्हाला वाटले नव्हते.
Chhatrapati Shivaji Maharaj Malvan Statue Collapse : मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यावेळी 45 किलोमीटर प्रति वेगानं वारे होते, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराजांच्या पुतळ्यांचे ज्या प्रकारे तुकडे झाले, अशी वेळ महाराष्ट्रावर कधी येईल, असे आम्हाला वाटले नव्हते, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याव जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना दिल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
संजय राऊत काय म्हणाले?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. हा पुतळा ज्या पद्धतीने आम्ही कोसळताना पाहिला, तो आमच्या महाराष्ट्राच्या हृदयावरील आघात कधीही भरुन निघणार नाही. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते किंवा ते चालवले जाते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या मतांचा विचार करत घाईघाईत या पुतळ्याचे उद्घाटन केले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगण्यात आलं होतं की इतक्या घाईत तुम्ही पुतळ्याचे अनावरण करु नका. तरीही घाईघाईने पुतळ्याचे अनावरण केले. त्या पुतळ्याच्या बांधकामावर, शिल्पकलेवर अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला. तरीही तो पुतळा घाईघाईने बसवण्यात आला आणि काल तो पुतळा कोसळला, असे संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्राच्या छातीत आरपार वेदना”
या महाराष्ट्रात छत्रपतींचा असा अपमान कधीही झाला नव्हता. औरंगजेब किंवा मुघलांनी हल्ले केले, पण छत्रपतींचा असा अपमान मुघल राजांनी किंवा त्यांच्या सरदारांनीही केला नव्हता. आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुखरुप सुटून बाहेर आले. पण आपल्या राज्यात त्यांच्यावर कोसळून पडण्याची वेळ आली. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुतळ्याचे काम केले. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना नेहमीप्रमाणे हे काम दिले. यात त्यांना किती कमिशन मिळालं, याचा हिशोब लावावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार सर्व ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ते कारण काहीही सांगतील. पण आज महाराष्ट्र दु:खी आहे. महाराष्ट्राच्या छातीत आरपार जी वेदना झाली आहे, त्याची भरपाई कोणीही करु शकणार नाही. महाराजांच्या पुतळ्यांचे ज्या प्रकारे तुकडे झालेले पाहिले, अशी वेळ महाराष्ट्रावर कधी येईल, असे आम्हाला वाटले नव्हते, असेही संजय राऊतांनी म्हटले
“राजकीय हेतूने हा पुतळा बनवण्यात आला”
सरकारच्या चेहऱ्यावर अजूनही हसू आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही वेदना दिसत नाही. सरकार म्हणतंय समुद्रावर जोरात वारा होता. किल्ल्यावर वारा असणारच. १९३३ मध्ये गिरगाव चौपाटी लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. तिथेही वारा त्याच वेगाने वाहत आहे. तेव्हापासून आजपर्यंत तो पुतळा तसाच उभा आहे. १९५६ मध्ये पंडीत नेहरुंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला आहे. तो किल्ल्यावर आहे, तिथेही हवा आहे. तोही आज सुस्थितीत आहे. पण ८ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर बनवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला. त्यांनी तो पुतळा चांगल्या मनाने बनवला नाही. राजकीय हेतूने हा पुतळा बनवण्यात आला, असे संजय राऊत म्हणाले.