मुंबईः पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. यानंतर त्यांना पुढे कोणती कोठडी देण्यात येणार, यावरची सुनावणी होईल. राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता जेजे रुग्णालयात (J J Hospital) नेलं. ही तपासणी झाल्यानंतर ईडीचे अधिकारी (ED Officials) त्यांना कोर्टासमोर हजर करतील. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलै रोजी संजय राऊत यांना ईडीने रात्री उशीरा ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आठ दिवस त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ईडीच्या विशेष न्यायालयानं त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ईडीची चौकशी अजून संपली नसल्यामुळे राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे न्यायालयात आज काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी प्रवीण राऊत, वाधवान यांच्यासोबत मिळून प्रकल्प पूर्ण न करता आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. यासाठी वर्षा राऊत यांनी 2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्याकडून 55 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोपही करण्यात आलाय. 2011 मध्ये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या प्रवीण यांच्या कंपनीत गुंतवणुकी व्यतिरिक्त 37 लाख रुपये दिले गेले आणि त्यानंतर वर्षा राऊत यांना 14 लाख रुपये देण्यात आले, आदी आरोप ईडीतर्फे करण्यात आले आहेत. 31 जुलै रोजी ईडीचं पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आळी होती. 8 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या विविध याचिकांवर उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 22 ऑगस्ट रोजी म्हणजे आजच ही सुनावणी होणार होती. मात्र ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच मंगळवारीदेखील शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. उद्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातर्फे कोणताही युक्तिवाद करण्यात येणार नाही. केवळ घटनापीठाकडे हा खटला वर्ग करण्यात येईल, असा निर्णय होण्याची शक्यता आहे.