अटी शर्ती नाहीच… एकनाथ शिंदे यांचा संताप होणारच, भाजपचा… संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊतांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सूचक विधान केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप या समीकरणात नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या संतापाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या एकत्रित येण्यात कोणत्याही अटीशर्ती नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबद्दल एक सूचक विधान केले आहे. “काही लोकांना समविचारी पक्ष एकत्र केलेले आवडत नाहीत. भाऊ एकत्र आलेले आवडत नाहीत. उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिसाद दिला यात कुठे अटी शर्ती आल्यात. दोन प्रमुख नेते भाऊ आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर सहमती होत आहे तर त्यामध्ये फार वाद विवाद करणे योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
“राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी… प्रश्न इतकाच आहे की या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही. ही अट नाही लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचे आहे आणि विशेषत: महाराष्ट्राच्या भावनेचा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंचा संताप समजू शकतो
“आमचे आणि राज ठाकरेंचे संबंध आजचे नाहीत. ते दोन्ही भाऊ आहेत. कौटुंबिक कार्यक्रमांना ते एकत्र येतात. माझ्या आयुष्यातील अनेक वर्ष त्यांच्यासोबतच गेली. मी एकनाथ शिंदे यांचा संताप समजू शकतो, पण देवेंद्र फडणवीस त्यांचा संताप दाखवणार नाहीत, पण त्यांच्या पोटात आतून ढवळाढवळ होत असेल. त्यांचा आनंद किती खोटा असतो, हे आम्हाला माहीत आहे. आतापर्यंत काड्या घालण्याचे काम कॅफेत जाऊन कोणी केले, हेही आम्हाला माहीत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच योग्य निर्णय घेतील. त्यात कोणीही आपले मत व्यक्त करण्याची गरज नाही,” असेही संजय राऊतांनी म्हटले.
“कोणती अट आणि शर्थ नाही”
“आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून जर या संदर्भात काम करणारी लोकं एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे. यात उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट आणि शर्थ टाकलेली नाही. महाराष्ट्रात हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नका, यात कोणती अट आणि शर्थ आहे”, असा सवाल संजय राऊतांनी केला.