राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाट टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, ‘शेवटचं सांगतो. प्रतिष्ठेची लढाई आहे. या राज्यात एक बाप आणि माय नाही की तिला वाटत नाही की आपलं पोरगं मोठं व्हावं. एक भाऊ नाही की त्याला वाटत नाही बहीण मोठी होऊ नये. प्रत्येक माय बापाला मुलं मोठी व्हावी वाटत आहे. या सरकारने आपल्या लढाईत बेदखल केलं.’
‘आपला अपमान केला. आपल्याला हिणवलं. आपल्याला खुन्नस म्हणून इतर १७ जाती ओबीसीत घातल्या. आपल्याला चॅलेंज आहे. आपल्याला ते आरक्षण देणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा आता तुम्हाला जात मोठी करायची, मुलगा मोठा करायचा की जातीचा आमदार मोठा करायचा. तुमची मुलगी आणि मुलगा नरक यातना सोसत आहे. त्याचा आक्रोश आहे.’
‘तुमचा मुलांचा आक्रोश सरकारने जाणला नाही. तुमची लेकरं मेले तरी त्यांना घेणंदेणं नाही, तुमच्या जमिनी गेल्या तरी त्यांना घेणं नाही. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये याचा पण त्यांनी घेतला आहे. त्यांना तुमची मुलं भिकारी करायचे आहे. त्यामुळे आता तुमच्या हातात आहे. आपली ताकद दाखवा. मराठ्यांनो जागे व्हा. मी सांगतो म्हणून नाही. तुम्ही कोणत्याही पक्षात असा. तुम्ही आज संध्याकाळी मुलाल जवळ घेऊन बसा. त्याला आरक्षणाचं महत्त्व विचारा. त्यावरून तुम्हाला आरक्षणाचं महत्त्व कळे. फडणवीसने तुमच्या मुला मुलींना संपवण्याचं ठरवलं आहे. अशा लोकांना निवडून दिलं तर तुम्ही तुमच्या मुलांची अग्निपरीक्षा पाहत आहात.’
‘तुम्हाला मनात आणि मतात फरक करावा लागेल. तुम्ही पक्षांच्या बाजूने राहिला, तुम्ही आमदारांच्या बाजूने राहिला आणि जातीसाठी जागला नाही तर या जगात तुम्हाला रडायलाही जागा राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते ठरवा.’