धुळ्यात दहा हजार किलो चांदी जप्त, मालकाची माहिती आली समोर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे १५ ऑक्टोबरपासून पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. राज्यात १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने, चांदी, मद्य आणि अंमलपदार्थांचा साठा मिळून आला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. मतदानाच्या दिवशी धुळ्यात मोठी घडामोड घडली आहे. पोलिसांनी अचारसंहितेमुळे सर्व वाहनांची तपासणी सुरु केली होती. त्यावेळीस एक कंटेनर अडवला. त्या कंटेनरची तपासणी केल्यावर त्यात दहा हजार किलो चांदी मिळाली. ही चांदी ९४ कोटी ६८ लाख रुपायांची आहे. पोलिसांना या चांदीचा मालक कोण? चांदी कुठून कुठे जात होती? त्याची माहिती मिळाली आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराले यांनी याबाबतची माहिती दिली.
चांदीच्या विटा निघाल्या बँकेच्या
धुळे पोलिसांच्या तपासणीत दहा हजार किलो चांदीच्या विटा मिळाल्या. ही चांदी एचडीएफसी बँकेचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांकडून नियमित तपासणी होत होती. यावेली पोलिसांनी एका कंटनेरला अडवले. हा कंटनेर चेन्नईहून जयपूरकडे जात होता. परंतु त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ती जप्त केली. तसेच त्याची माहिती आयकर विभागाला दिली. कागदपत्रे मिळाल्यावर ही चांदी परत देण्यात येणार आहे.
चांदीची रक्कम वेगळता धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता एकूण नऊ कोटी अकरा लाख तीस हजार रुपयाची रोकड जप्त करण्यात आली. तसेच अमली पदार्थ आयुर्वेद दारू साठा आणि सोने चांदीचे दागिने जप्त केले. एकूण 19 कोटी 50 लाख 56 हजार 937 रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली.
राज्यात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे १५ ऑक्टोबरपासून पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. राज्यात १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने, चांदी, मद्य आणि अंमलपदार्थांचा साठा मिळून आला. विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.