लीड मिळाले नाही तर… सरपंचांचा हिशोब घेणार, नितेश राणे यांचा सज्जड दम
sindhudurg Lok Sabha Election: सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही.
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे. एकीकडे प्रचाराचा धडका सुरु असताना महायुतीकडून काही जागांवर उमेदवार दिला गेला नाही. ठाणे, सिंधुदुर्ग, कल्याण, नाशिक येथील जागेवर महायुतीचा उमेदवार नाही. सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नाही. परंतु नारायण राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. आता या प्रचार दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दमच भरला आहे. सर्वांचा हिशोब ४ जूनला होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले नितेश राणे
सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दम दिला आहे. ते म्हणाले की. सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र माझी तक्रार करू नका, असा दम नितेश राणे यांनी भरला.
नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणे म्हणाले, संजय राऊत वेडा झालाय. खरच वेडा झालाय. मोदी साहेब म्हणे उद्धव ठाकरेंना घाबरतात. तुमचे पाच खासदार आणि मोदी साहेब यांना घाबरणार. अतिरेकी कारवाया करणाऱ्या शेजारच्या देशांना मोदींनी सांगितलय अतिरेकी कारवाया कराल तर घुसून मारू….असे आमचे मोदी साहेब. मग या शेंबड्या उद्धव ठाकरेला मोदी घाबरणार का?
उद्धव ठाकरे यांना फार मस्ती चढली आहे. त्यांचे खासदार किती पाच आणि भाजपचे ३३०. त्यांना मी ३९ वर्षे जवळून पाहिलाय. अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते. त्यावेळी मंत्रालयात फक्त दोन वेळा आले. बाकीच्यावेळी मातोश्रीत कडी लावून खोलीत बसले होते. आता ते फुशारक्या मारतात. वाकडे तिकड संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे बोलल्यास परत जायला देणार नाही, असे राणे म्हणाले.