मग सहा महिन्यात कुठं गेलं, परकीय व्यक्तीचं धोरण? अजित पवार यांचा शरद पवार यांना रोखठोक सवाल
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आर. आर. आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आलं असतं. मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो.
जुन्नर/पुणे | 25 जानेवारी 2024 : आजवर शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि भाजपचे ही मुख्यमंत्री झाले. पण, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आर. आर. आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आलं असतं. मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो. वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो. पण, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना केला. तसेच, त्यावेळी तुमचं परकीय व्यक्तीचं धोरण असा टोलाही लगावला.
जुन्नर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केलीय. 1991 ला मी खासदार झालो. कालांतराने मला राजीनामा द्यावा लागला. माझ्या जागी शरद पवार साहेब खासदार झाले. केंद्रात मंत्री झाले. मला राज्यात मंत्री करण्यात आलं. पुढं 1995 ला मी फक्त आमदार होतो, आघाडीचे सरकार त्यावेळी पडलं असे त्यांनी सांगितले.
1999 साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं असं मत वरिष्ठांनी घेतलं. अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. मग सहा महिन्यात कुठं गेलं तुमचं परकीय व्यक्तीचं धोरण? तुम्ही जे केलं ते चालतं. मग, आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चासकमान, भामा आसखेड आणि डिंभे धरणासाठी खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांनी पाणी पळवायचं काम सुरू केलं होतं, अशी टीका त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली. हा प्रकार म्हणजे धरणं उशाशी आणि कोरड घशाशी. मग, हे दिलीप वळसे आणि अतुल बेनके कसं काय खपवून घेतील. जनतेने काय यासाठी त्यांना निवडून दिलंय का? मतदारांचे प्रश्न सोडवायचे सोडून ते त्या मतदारांना कसं काय संकटात टाकतील असे अजित पवार म्हणाले.
दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावचे पाणी वाचविण्यासाठी निर्णय घेतला. मागे एक वर्ष आपण सत्तेत नव्हती तर अनेक काम रखडली. माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप करण्यात आला. 1960 पासून जलसंपदा विभागात 45 हजार कोटींची खर्च झाला. माझ्यावर काय आरोप झाला की मी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. धादांत खोटा आरोप होता हे पुढं सिद्ध झालं. सत्तेशिवाय कोणताही विकास होत नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.