“लाडकी बहीण योजनेनंतर आता तो जीआरही काढा”, महिलेचे एकनाथ शिंदेंना रक्ताने पत्र
येत्या राखी पौर्णिमेला लाडक्या बहिणींसाठी तो जीआर काढून खरी ओवाळणी द्या अशी मागणी तिने या पत्रात केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Solapur Women Blood Letter to CM Eknath shinde : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी राज्यातील अनेक महिलांची धडपड सुरु आहे. त्यातच आता सोलापुरातील बार्शी या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रक्ताने पत्र लिहिले आहे. यात तिने महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेचे काय झालं, असा प्रश्न विचारला आहे.
बार्शीमधील समाज परिवर्तन महासंघाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने हे पत्र लिहिले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्याचा जीआर निघालेला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसोबतच मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर काढा अशी मागणी या महिलने केली आहे.
काय म्हटलंय पत्रात?
“पत्रास कारण की मी गेले सहा महिने समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून सर्व जाती धर्माच्या मुला-मुलींना मोफत सर्व शाखेतील पदवी-पदविकेचे म्हणजेच डिप्लोमा-डिग्रीचे उच्च तंत्र शिक्षण मिळावे, म्हणून प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना डिप्लोमा-डिग्रीचे १ जून २०२४ पासून मोफत देण्याची घोषणा केली. पुन्हा २० जूनच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी लवकरच मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली.
परंतु जुलै महिना सुरु झाला, पण अद्यापही सरकारकडून मोफत शिक्षणाचे परिपत्रक जीआर निघाला नाही. हा महाराष्ट्र सावित्री फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, जिजाऊंचा, फातिमा शेरव अशा कर्तबगार महिलांचा आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्या डोळ्यासमोर आपले लेकरु मरत असेल, तर त्याच्या वेदना काय असतात हे दु्र्देवाने आपणास ठाऊक आहे. आपण लाडकी बहिण योजना आणली, आपले धन्यवाद. बहिणींच्या लेकराच्या शैक्षणिक भविष्यासाठी विचार करुन तातडीने मुलींच्या मोफत शिक्षणाचे परिपत्रक काढून लाडक्या बहिणींना राखीपोर्णिमेला आपल्याकडून खरी ओवाळणी असेल. मी श्रद्धा अजय पवार हे पत्र माझ्या रक्ताने लिहून मुख्यमंत्री महोदय आपणास पाठवत आहे”, असे तिने या पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिलेल्या या महिलेचे नाव श्रद्धा अजय पवार असे आहे. ही महिला सोलापूरच्या बार्शीमधील समाज परिवर्तन महासंघाची पदाधिकारी आहे. या पत्रात तिने येत्या राखी पौर्णिमेला लाडक्या बहिणींच्या मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर काढून खरी ओवाळणी द्या अशी मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.