‘…तर लाडकी बहीणचे पैसे सरकारला परत करणार’, या बहिणींनी का घेतला निर्णय?
ladki bahin yojana: आम्ही मतदान प्रक्रिया करणार नाही मात्र वेगळ्या पद्धतीने लढा देत राहणार असल्याचे मारकडवाडी गावातील ग्रामस्थ्यांनी सांगितले. आम्हाला गावात मतदान कमी कसे काय झाले? हे पाहायचे आहे. विजयसिंह मोहिते पाटील किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला आमच्या गावाने आजपर्यंत मताधिक्य दिले नाही.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मार्कडवाडी गाव राज्यभरात चर्चेत आले आहे. या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया ३ डिसेंबर रोजी होणार होती. मतदान करण्यासाठी गावातील काही महिला मतदार मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. परंतु प्रशासनाने ही मतदान प्रक्रिया बेकायदेशीर ठरवल्यानंतर मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. यावेळी लाडकी बहीण योजनेवरही महिलांनी इशारा दिला.
…तर सरकारला पैसे परत करणार
मारकडवाडीच्या ग्रामस्थ अनिता कोडलकर यांनी सांगितले की, ईव्हीएममध्ये काहीतरी घोळ वाटतोय अन्यथा एवढे कमी मतदान उत्तम जानकर यांना होत नाही. आमचे गाव नेहमी उत्तम जानकर यांना मतदान करते. मात्र यावेळेस त्यांना गावातून कमी मते पडले आहेत. त्यामुळे आम्ही परत मतदान करण्याची मागणी करत आहोत. सरकारने आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे दिले. मात्र ते पैसे आम्ही खात्यातून काढले नाहीत. सरकारने पैसे परत मागितले तर त्यांना देऊन टाकणार, असे त्यांनी सांगितले. महायुतीला मिळालेले यश हे लाडक्या बहीण योजनेमुळे मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी या बहिणींनी पैसे परत करण्याची भूमिका घेतली आहे.
बॅलेट पेपरवर मतदान रद्द
सोलापूर मारकडवाडी गावात आज होणारे बॅलेट पेपरवर मतदान रद्द करण्यात आले. शाळेतील मुलांचा नागरिकांचा विचार करून निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकार यांनी दिली. मतदान प्रक्रियेतून माघार घेतली असली तरी लढा देत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
गावकरी म्हणतात, आंदोलन…
आम्ही मतदान प्रक्रिया करणार नाही मात्र वेगळ्या पद्धतीने लढा देत राहणार असल्याचे मारकडवाडी गावातील ग्रामस्थ्यांनी सांगितले. आम्हाला गावात मतदान कमी कसे काय झाले? हे पाहायचे आहे. विजयसिंह मोहिते पाटील किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला आमच्या गावाने आजपर्यंत मताधिक्य दिले नाही. मग यावेळी भाजपला कसे काय लीड मिळाले असा सवाल ग्रामस्थांनी केला. मारकडवाडी गावामध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिक मतदान झाल्याने ग्रामस्थांनी ईव्हीएम खापर फोडले आहे.