साखर कारखान्याविरोधात आली तक्रार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याची लाचेची मागणी, असा अडकला जाळ्यात
अजित पाटील यांनी तक्रारदार कारखाना प्रशासनाकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
सोलापूर : जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्याच्या (Education Officer) लाज प्रकरण नुकतेच समोर आले. त्यानंतर आता सोलापुरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास (pollution board officer) लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. साखर कारखान्याविरोधात (Sugar Factory) प्रदूषण नियंत्रण मंडळात तक्रार आली. आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी या अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. अजित वसंतराव पाटील असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याविरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केली. त्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता तसेच परवाना देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच उपप्रादेशिक अधिकाऱ्याने मागितली होती. साखर कारखान्याकडून हवा आणि पाणी प्रदूषण होत आहे. त्याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती.
तक्रारदाराला साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन नूतनीकरण करावयाचे होते. त्यासाठी अजित पाटील यांनी तक्रारदार कारखाना प्रशासनाकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून तक्रारीची शहानिशा झाली. त्यानंतर बुधवार 21 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 2 लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहात पकडत त्याच्यावर कारवाई केली. अशी माहिती सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी दिली.
लाच देणे-घेणे हा शिष्टाचाराचा भाग झाल्याचं दिसून येतं. बहुतेक सर्व विभागात थोड्या फार फरकानं हा गैरप्रकार होत असतो. पण, बरेच जण चुप्पी साधून असतात. एखाद्यानं तक्रार केली की, अशी प्रकरण उघडकीस येतात. लाख दीड लाख रुपये पगाराची काही माणसं लाचेची मागणी करून प्रकरण दाबतात. त्यापैकी अशी काही मोजकी प्रकरण समोर येतात.