‘इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्योंकि…’, राम सातपुते यांचा प्रणिती शिंदे यांना टोला
"मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटायला या ठिकाणी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, ते त्या बोलून दाखवतात. मी सध्या माळशिरसच्या जनतेची सेवा करतोय आणि त्यात मी आनंदी आहे", असं राम सातपुते म्हणाले.
भाजप आमदार राम सातपुते यांनी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांना शेरोशायरीतून टोला लागवला. “सोलापूरच्या जनतेने आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही हा पराभव मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे. जसा पराभव पचवता आला पाहिजे तसा विजयही पचवता आला पाहिजे. प्रणिती शिंदे यांना विजय पचवता येत नाहीय. त्यामुळे त्यांची अहंकारातून वाचाळ बडबड सुरू आहे. सोलापूरकरांचा विकास आणि जनतेचे प्रश्न ते कधीही सोडवणार नाहीत. प्रणिती शिंदे या फक्त स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील. मात्र आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे हे आता सोलापूरकर पाहतील”, असं राम सातपुते म्हणाले.
“प्रणिती शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करतो. चंद्रकांत दादा यांच्या वयाचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहत आहे. येत्या काळात त्या ज्या पद्धतीची भाषा वापरून स्टंटबाजी करत आहेत हे इथली जनता पाहत आहे. त्यामुळे विकास आणि इथले प्रश्न याबाबत खासदार काम करतील का? याबाबत शंका आहे. फक्त स्टंटबाजी करणे हा यांचा स्वभाव आहे”, अशी टीका राम सातपुते यांनी केली.
राम सातपुते काय म्हणाले?
“मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटायला या ठिकाणी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, ते त्या बोलून दाखवतात. मी सध्या माळशिरसच्या जनतेची सेवा करतोय आणि त्यात मी आनंदी आहे”, असं राम सातपुते म्हणाले.
यावेळी राम सातपुते यांनी मतदार यादी नाव डिलीशन प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “हा निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि ती एक स्वायत्त संस्था आहे. येत्या काळात आमचे कार्यकर्ते ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम करतील. हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये. समजने वालो को इशारा काफी हैं. इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्योंकि तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, अशा शब्दांत राम सातपुते यांनी शेरोशायरीतून प्रणिती शिंदे यांना टोला लगावला.