सोलापुरात भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप पक्षातून बडतर्फ, कारवाईचं कारण काय?
करमाळा तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. माढा लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे.
पक्षविरोधी काम केल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. शंभूराजे जगताप हे करमाळा तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर माढा लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ही कारवाई केली आहे. सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा पदावरुन बडतर्फ केल्यानंतर शंभूराजे जगताप यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला पहिली प्रतिक्रिया दिली.
“मला अजून पत्र मिळालं नाही. मला लोकांकडून कळलं. माझी पक्षप्रमुखांकडे विनंती असेल, ज्यांनं बडतर्फ केलंय त्यानं तर ते पत्र पोहचावे. मी पक्षाविरुद्ध काय काम केलंय? ते सांगावं. आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात काम केलं नाही. सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेते म्हणालेत मी चांगल्या पद्धतीने काम केलंय. टेंभुर्णीतील कार्यक्रमात प्रल्हादसिंह पटेल यांनी देखील माझे कौतुक केले होते. माझं अजून पक्षावर प्रेम आहे. मला वाटत नाही पक्षाने मला बडतर्फ केलंय”, अशी प्रतिक्रिया शंभूराजे जगताप यांनी दिली.
‘भविष्यात मी अडथळा होऊ नये म्हणून बडतर्फ’
“काही ठराविक नेत्यांनी त्यांना मी जड होत असेल, कदाचित मला असं वाटतंय, त्यांच्या भविष्यात मी अडथळा होऊ नये म्हणून बडतर्फ करण्यात आलंय. भविष्यात जर आमच्या तालुक्यात आम्हाला योग्य ताकद मिळत असेल तर जो पक्ष इथे चांगल्याप्रकारे काम करतोय निश्चित आम्ही सगळे विचार करू. आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही माझ्यासाठी रोड मॉडेल आहेत. अनेक जणांना जगताप गटाने आमदार, खासदार केलंय. माजी आमदार जयवंतराव जगताप जे धोरण ठरवतील ते आम्ही 100 टक्के पाळणार”, असंदेखील शंभूराजे जगताप म्हणाले.