सागर सुरवसे, सोलापूर : संपूर्ण जगभरात आज नव्या वर्षाचा उत्साह सुरु असताना महाराष्ट्रात दोन दुर्देवी घटना समोर आल्या आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कंपनीत आग लागली. ही आग विझवण्याचं काम अजून सुरुच असताना सोलापुरातून आणखी एक अतिशय वाईट आणि दुर्देवी घटना समोर आलीय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जातेय. संबंधित घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.
संबंधित घटना ही बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ घडलीय. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.
या कारखान्यात 40 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
या स्फोटामध्ये आतापर्यंत तीन मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
बार्शीमध्ये मिनियार नामक व्यक्तीच्या 4 एकर ब्रेकर क्षेत्रावर फटाक्यांची फॅक्टरी आहे. या फटाका फॅक्टरीमध्ये बांगरवाडी, वालवड, उकडगाव या भागातले कामगार काम करत होते.
विशेष म्हणजे घटनेनंतर एक तास उलटला तरी रुग्णवाहिका किंवा प्रशासन घटनास्थळी पोहोचू शकलेलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
दरम्यान, स्थानिकांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करत घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली.
“एक तास आम्ही परिश्रम केलं. सगळा राडा उठला होता. या पोरांनी आणि काही गावातील लोकांनी मदत केलीय. लोकांना बाजूला केलं. जी माणसं अतिगंभीर होती त्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवलं आहे. साधारणपणे अजून दहा ते बारा आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली.