सोलापुरात ‘या’ परिसरात संचारबंदीचे आदेश, मंदिर, प्रार्थना स्थळ, हॉटेल सर्व बंदचे आदेश
सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात पोलिसांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.
सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. साखर कारखान्यापासून एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहेत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टोरंट, बार, हॉटेल, धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी चार वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार, 13 ते 18 जूनपर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनास बंदी असेल.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आज रात्री बारा वाजेपासून ही वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणीचे पाडकाम रात्रीपासून सुरु होणार आहे.
विशेष म्हणजे गेल्या 8 वर्षांपासून चिमणी पाडकामाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू होती. अखेरीस मुंबई हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला सुनावणी घेऊन कारवाईचे अधिकार दिले होते.
दरम्यान महापालिकेने सिद्धेश्वर कारखाना प्रशासनाला 45 दिवसांची मुदत देत चिमणी पाडून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र सिद्धेश्वर कारखाना प्रशासनाला दिलेली नोटीस 11 जून रोजी समाप्त झाल्याने 14 जून पासून तोडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आज रात्री बारा वाजेनंतर ही कारवाई करण्यात येणार आहे.