पंढरपुरात नागरिकांच्या जीवाशी खेळ, ड्रेनेजचे पाण्यावर प्रक्रिया आणि मग शहराला पाणी पुरवठा?
पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ड्रेनेजचं पाणी चंद्रभागा नदीत सोडलं जातंय. त्यानंतर जे घडतंय ते धक्कादायक आहे. चंद्रभागा नदीला खूप महत्त्व आहे. चंद्रभागा नदीच्या पाण्यात जो स्नान करतो, तो धन्य होतो, असं मानलं जातं. पण आता वेगळंच काहीतरी घडतंय.
रवी लव्हेकर, Tv9 मराठी, पंढरपूर | 23 सप्टेंबर 2023 : पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. पण तोही ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण करून होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित प्रकार समोर आल्याने नागरिकांमधून संताप केला जातोय. पंढरपूर शहराच्या उपनगरातून ड्रेनेजचे पाणी चंद्रभागेच्या पात्रात सोडले जाते. हेच पाणी पुढे शहराला होणारा वाटर सप्लायपर्यंत पोहोचत असून, तेच पाणी शहरातील नागरिकांना तसेच वारकरी भाविकांना शुद्धीकरण करून एक दिवसाआड पाजण्याचे पाप सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल.
माजी नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुरज पावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून व्हिडिओ क्लिप व्हायरल केलीय. सध्या शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यातून पाण्याचा वास येत असल्याने काही संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पिण्याच्या पाण्याची चौकशी केली. तसेच या प्रकाराचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. प्रशासनाच्या अशा जीवघेण्या प्रकारामुळे अनेकांना साथीचे आजार, त्वचारोग होण्याची शक्यता आहे.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
“अहिल्या ब्रिजच्या पलीकडे रेल्वे ब्रिज आणि तिथूनच पंढरपूरचा वाटर सप्लाय आहे. इथे पाण्याचा उपसा करुन लिंक रोड येथील पंप हाऊसमध्ये नेलं जातं. तिथे पाण्यावर शुद्धीकरण करुन शहराला पाणी पुरवाठा केला जातो”, असं व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
“मुख्यमंत्री जागी होतील का? नमामी चंद्रभागेची घोषणा करणारं सरकार जागी होईल का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाणी पितील का? मग हे पाणी भाविकांनी आणि पंढरपूरच्या नागरिकांनी का प्यावं?” असा सवाल करण्यात आलाय. तसेच “राज्यात विरोधी पक्ष आहे का?”, असाही प्रश्न व्हिडीओमधून करण्यात आलाय.
दरम्यान, संबंधित व्हिडीओवर आता प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाप्रकारे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन खरंच शहराला पाणी पुरवठा केला जात असेल तर हा प्रकार निश्चितच अयोग्य आहे. त्यामुळे आता प्रशासन काय प्रतिक्रिया देतं? ते महत्त्वाचं आहे. तसेच राज्य सरकार या व्हिडीओची दखल घेतं का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.