सोलापुरात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या विरोधात उपोषण करणाऱ्यांवर रिव्हॉल्वर दाखवत दमदाटी, माजी अध्यक्षाचं संतापजनक कृत्य
सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्त्यांना रिव्हॉल्वर दाखवल्याचं संतापजनक कृत्य केलंय.
सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीच्या विरोधात उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना कारखान्याच्या माजी अध्यक्षाकडून रिव्हॉल्वर दाखवत दमदाटी केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्त्यांना रिव्हॉल्वर दाखवल्याचं संतापजनक कृत्य केलंय.
विशेष म्हणजे संबंधित प्रकाराचा व्हिडीओदेखील समोर आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या सोलापूर विकास मंचच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय.
“जास्त नाटक केलं तर गोळ्या घालीन”, असा दम देत धर्मराज काडादी खिशातून रिव्हॉल्वर काढतात, असं व्हिडीओत दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय. संबंधित व्हिडीओचा ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.
धर्मराज काडादी यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांना दमदाटी केलीय. साखर कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापूरची विमानसेवा बंद आहे. त्यामुळे ती चिमणी पाडावी यासाठी मागील 25 दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
दरम्यान, कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आज उपोषणस्थळी जाऊन रिव्हॉल्वरने केतन शहा यांना धमकावले. त्यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
धर्मराज काडादी आणि केतन शाह यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झालाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची ही घटना असून गुन्हा दाखल करायचा की नाही या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेणार असे केतन शाह यांनी सांगितलय. तसेच आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलंय.