Solapur Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, चार महिला जागीच ठार
नगरहून दहा जण इको गाडीने तुळजापूरला दर्शनासाठी निघाले होते. मात्र दर्शनाला पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सोलापूर / 23 ऑगस्ट 2023 : राज्यात अपघाताच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. नगरहून तुळजापूरला दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या गाडीला सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकने गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अन्य सहा जण जखमी झाले असून, जखमींमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील यावली गावाजवळ हा अपघात झाला.
मालट्रकने धडक दिल्याने अपघात
नगर जिल्ह्यातील रांझणगाव येथील 10 जण मारुती इको कारने तुळजापूरला दर्शनासाठी चालले होते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील यावली गावाजवळ येताच भाविकांच्या गाडीला मालट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात गाडीला भीषण अपघात होऊन गाडीतील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे.
आदम अली शेख, हिराबाई रामदास पवार, कमलाबाई मारुती वेताळ, द्वारकाबाई नागनाथ गायकवाड अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर बाई बाबू पवार, छकुली भीमा पवार, सई योगीराज पवार, मंदाबाई नाथा पवार, सुरेखा भारत पवार आणि बायजाबाई रामदास पवार अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.