नाकाला ऑक्सिजनची नळी आणि हाताला सलाईन, ‘प्रेरणा’ बारावीच्या पेपरसाठी थेट रुग्णालयातून परीक्षास्थळी
बारावीच्या प्रेरणा नावाच्या विद्यार्थीने आजारपणात केलेल्या धाडसाने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. प्रेरणा आजारी असताना बारावीची परीक्षा देतेय. वर्षभर अभ्यास केल्यानंतर वर्ष वाया जाऊ नये, अशी पोटतिडकी तिची यातून दिसून येतेय.
सोलापूर : आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा इतक्या नकारात्मक घटना घडत असतात की त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह कसं राहावं? असा प्रश्न पडतो. त्यातून आपण नैराश्याच्या गर्तेत जास्त अडकत जातो. पण काही माणसं त्याला अपवाद असतात. आजूबाजूला कितीही नकारात्मक घडत असलं, याशिवाय त्या स्वत: व्यक्तीसोबत कितीही वाईट घडत असलं तरी ती व्यक्ती आतून प्रचंड ताकदवान असते. ती व्यक्ती इतकी सकारात्मक असते की तिच्या सहवासाने, तिच्या वागणुकीने अनेकांना जगण्याची आणि संघर्षाची उमेद मिळते. करमाळ्याच्या बारावीची परीक्षा देणाऱ्या प्रेरणाने अशीच उमेद अनेकांच्या मनात जागृत केली आहे.
राज्यात सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षा मानल्या जातात. कारण अनेक विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं याबाबत ठरवलेलं असतं. दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळावे यासाठी लाखो विद्यार्थी प्रयत्नांची पराकष्ठा करतात. अनेकजण फार हलाखीच्या आणि अडचणीच्या परिस्थितीत अभ्यास करुन या परीक्षा देतात आणि आपलं शिक्षण पूर्ण करतात. या परीक्षांचं महत्त्व काय असतं ते सांगणारा आजचा प्रसंग आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. ही गोष्ट आहे, प्रेरणा बाबर नावाच्या बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीची.
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता 12 ची परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी प्रेरणा बाबर या रायगांव (ता. करमाळा) येथील विद्यार्थिनीने ॲम्बुलन्समधून परीक्षेला येत रसायनशास्त्राचा पेपर दिला. विशेष म्हणजे नाकाला ऑक्सिजनची नळी आणि हाताला सलाईन लावून या विद्यार्थीनीने पेपर दिला. त्यामुळे अनेकांना या मुलीबद्दल अप्रुप वाटतंय. काही पालकांच्या डोळ्यांमध्ये तिची अवस्था पाहून पाणी तरळलं. पण प्रेरणाने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात खरंच प्रेरणा जागृत केली.
आपण आपल्या संघर्षातून इतरांना प्रेरणा देणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. प्रेरणाने जे धाडस दाखवलंय त्याची तुलना कधीच कशासोबत करता येणार नाही. विशेष म्हणजे तिच्या धाडासासाठी तिला पाठिंबा देणाऱ्या डॉक्टर आणि पारिचारिकांचं कर्तृत्व तितकंच मोठं आहे. प्रेरणाच्या परीक्षेसाठी संबंधित परीक्षा केंद्रास्थळातील शिक्षकांचे प्रयत्नदेखील वाखणण्यासारखेच आहेत.
प्रेरणाला करमाळा येथील खाजगी हॉस्पिटलमधून पेपर देण्यासाठी ॲम्बुलन्समधून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर आणण्यात आलं. महाविद्यालयात अचानक ॲम्बुलन्स आल्याने नेमका हा काय प्रकार आहे? हे परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे थोडावेळ विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाख यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना ॲम्बुलन्स कशासाठी आली आहे याबाबत कल्पना दिली.
केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी या विद्यार्थिनीची बैठक व्यवस्था केली. पेपर सुरू असताना डॉ. रविकिरण पवार आणि डॉ. कविता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीचारीका राजश्री पाटील यांनी उपचार सुरु ठेवले. प्रेरणा बाबर या विद्यार्थ्यीनीने आजारी अवस्थेत परीक्षा देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सहकेंद्र संचालक लक्ष्मण राख, सुवर्णा कांबळे पर्यक्षेकांनी सहकार्य आणि उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.
हा पेपर सुरु असताना डॉ. रविकिरण पवार, डॉ. कविता कांबळे, डॉ. अमोल घाडगे, डॉ. महेश अभंग, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. वर्षा करंजकर, डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिचारिका राजश्री पाटील यांनी उपचार चालू ठेवले. पेपर संपल्यानंतर पुन्हा प्रेरणा बाबर हिला उपचारासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.