महाराष्ट्रावर प्रेम असावं तर ‘या’ कन्नड शाळेच्या चिमुकलींसारखं, एकनाथ शिंदे यांना भेटणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना रोखठोक खडसावणार
अक्कलकोटमधील कन्नड शाळेतील 32 विद्यार्थिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन राजकारण तापलं असताना सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. सोलापुरात कन्नड शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकलींना महाराष्ट्रात राहायचं आहे. त्यांना कर्नाटकात जायचं नाही. त्यामुळे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं चिमुकलींनी सांगितलंय. महाराष्ट्राची संस्कृती, भाषा, मराठी माणसं, उत्सव आणि माती यांवर असणारं आपलं प्रेम या चिमुकलींनी आपल्या वागणुकीतून आणि बोलण्यातून दाखवून दिलंय. त्यांना महाराष्ट्रातच राहायचं आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थीनी कन्नड शाळेत शिक्षण घेत आहेत. सीमाभागातील अनेक गावं कर्नाटकात जायची भाषा करत आहेत. अशा परिस्थितीत कन्नड शाळेच्या विद्यार्थिनींची ही भूमिका चर्चेला कारण ठरत आहे.
अक्कलकोटमधील कन्नड शाळेतील 32 विद्यार्थिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या विद्यार्थिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन देऊन आम्हाला कर्नाटकात जायचं नाही, असं स्पष्ट सांगणार आहेत.
या सर्व विद्यार्थिनी अक्कलकोटच्या मैंदर्गी येथे शिक्षण घेत आहेत. त्या सर्व इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे “आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे”, असे निवेदन देणार आहेत.
विद्यार्थिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकं काय सांगणार?
“आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहोत. आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे, कर्नाटकात जायचे नाही”, असं सर्व विद्यार्थिनींनी सांगितलं.
“आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाठोपाठ बंगळुरुला जाऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे. कर्नाटकात यायचे नाही”, अशी प्रतिक्रिया सोलापुरातील कन्नड शाळेतील विद्यार्थिंनी दिली.