‘तू मराठवाड्यात आला तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो’, मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्यातील अनेक नेत्यांवर टीका केली. त्यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यापासून टीकेला सुरुवात केली. त्यांनी नारायण राणे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. तसेच त्यांनी शरद पवारांनाही टोला लगावला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज सोलापुरात शांतता रॅली पार पडली. या रॅलीत मनोज जरांगे यांनी भाषण केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. नारायण राणे यांनी नुकतंच आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. मनोज जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामध्ये नारायण राणे हे देखील आहेत. नारायण राणे यांनी जरांगेंच्या विरोधात थेट कोकणात दौरा करणार असल्याचा इशारा दिलाय. त्यावर मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांनी खोचक टीका केली. “मराठ्यांनी 2024 मध्ये ठरवायचे कुठे बसायचे. माझ्या विरोधात टोळ्या उतरवण्यात आल्या. कोकणातील एक जण सध्या भिताडाकडे बघत आहे, हे अग्या मोहळ कुठे कुठे चावेल. मी कधीच म्हणालो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. तू मराठवाड्यात आला तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो”, असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी लगावला.
“मी जर पिसाळलो तर खूप अवघड होईल. ते म्हणाले, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलायचे नाही. तुमचा फडवणीस कसा काय, तुम्ही त्यांचे सगेसोयरे पण नाही. जात हीच बाप, पक्ष नाही आणि नेता नाही. मी अडाणी आहे, पण कसे मुंडके भादरले. पडायचे का सगळे, हे सांगा. मग 29 तारखेला या अंतरवालीमध्ये”, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.
जरांगेंचा मोठा इशारा
“मंत्री छगन भुजबळ आजकाल दिसत नाहीत. छगन भुजबळला जो नेता ज्या मतदारसंघात घेऊन जाईल तो नेता पाडायचा. आता नाव घेऊन पाडायचे, मराठ्यांना खेटल्यावर काय होते, आम्ही तुमच्या कधी दारात आलो नाही, कधी बोललो नाही, पण एक लक्षात असुद्या, आमच्या नादाला लागाल तर राजकीय सुफडा साफ करू”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
“तू कोण 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा? फडवणीस यांना का बोलतो? याचे कारण म्हणजे अंतरवलीमध्ये माता महिलांवर गोळ्या झाडल्या होत्या. तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने बोलला नाही. तुम्हाला वाटते तुमचा पक्ष, नेता मोठा झाला पाहिजे, पण आम्हाला वाटते आमची जात मोठी झाली पाहिजे. खानदानी मराठा आता पक्षाचा प्रचार करणार नाहीत. सहाही पक्षांना सांगत आहे”, असा इशारा जरांगेंनी दिला.
जरांगेंची राज ठाकरेंवर टीका
“मी म्हणतो मुंबई नको. पण मराठ्यांची पोरं म्हणतात मुंबई चला. मराठ्यांची शान कधीच जाऊ देणार नाही. मला वाटले असते तर मी म्हणालो असतो याला धाराशिवच्या बाहेर जाऊ देऊ नका”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
जरांगे यांचा शरद पवारांना टोला
“काही जण पावसात निवडून येण्यासाठी भिजतात. आपण जातीसाठी भिजू”, असा टोला मनोज जरांगे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लगावला. “विधानसभेला आपला माणूस देताना एकच माणूस द्या. समाज जो ठरवेल त्याच्या बाजूने उभे राहा. मराठ्यांनी एक मताने रहा, काहीही होऊ शकते. सरकार आरक्षण देण्याच्या भूमिकेत दिसत नाही. सरकारने अभियान सुरू केले आहे. मराठे समन्वयक फोडायला सुरवात केली आहे. फडवणीस आणि दरेकर यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले आहेत. पण आपण गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळावर लावून घेऊ नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.