मराठा कार्यकर्त्यांनी शहाजी बापूंची गाडी अडवली, वाहनचालकाला शिवीगाळ
मराठा कार्यकर्ते आज पंढरपुरात चांगलेच आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी आज सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी अडवली. यावेळी मराठा आंदोलकांनी शहाजी पाटील यांना जाब विचारला. आमदार-खासदारांना गावबंदी असताना तुम्ही इथे का आलात? असा सवाल मराठा आंदोलकांनी केला. यावेळी शहाजी बापू यांनी आंदोलकांची हात जोडून माफी मागितली.
सोलापूर | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या दरबारीदेखील जोरदार हालचाली सुरु आहेत. राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्यावं, अशी मागणी केलीय. त्यांच्या या मागणीवर आजच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली. यावेळी सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून सविस्तर भूमिका मांडण्यात आली. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या कार्यात सर्वांनी सहकार्य करावं, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावं आणि उपोषण सोडावं, असं सर्वांचं एकमत झालं. सरकार दरबारी एकीकडे घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे राज्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत.
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल’ या डायलॉगमुळे प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांना सांगोल्यात आदराचं देखील स्थान आहे. ते सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांच्यासोबत आज अनपेक्षित घटना घडली. मराठा आंदोलकांनी आज त्यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
मराठा कार्यकर्ते पंढरपुरात चांगलेच आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी आज सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी अडवली. मराठा आंदोलकांनी पंढरपूरच्या कराड नाक्यावर शहाजी बापूंची गाडी अडवली. यावेळी शहाजीबापूंच्या गाडीच्या वाहनचालकाने अंगावर गाडी घातल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलक शहाजी बापू यांच्या वाहनचालकावर प्रचंड संतापले. त्यांनी वाहनचालकाला शिवीगाळ केली.
आंदोलकांचा रोष पाहता अखेर शहाजी बापू यांना गाडीतून खाली उतरावं लागले. शहाजी बापू यांनी यावेळी आंदोलकांची हात जोडून माफी मागितली. यावेळी आंदोलकांनी शहाजी बापू यांना जाब विचारला. तुम्हाला गावबंदी असताना तुम्ही इथे का आलात? असा सवाल आंदोलकांनी केला. यावेळी शहाजी बापू यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “ड्रायव्हरला एवढी मस्ती आली. तुमच्यामुळे भीक मागायची पाळी आली”, असं आंदोलक शहाजी बापूंच्या वाहनचालकाला उद्देशून म्हणाले.