राष्ट्रवादीचा आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, भाजप पुन्हा मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत?

| Updated on: Nov 03, 2022 | 6:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.

राष्ट्रवादीचा आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, भाजप पुन्हा मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत?
Follow us on

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. त्यांच्या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय. राज्यात तीन महिन्यांपूर्वी सत्तापालट झाली. सत्तेतील महाविकास आघाडी सरकार विरोधकांच्या बाकावर आले तर विरोधी बाकावर असलेला भाजप पक्ष आता सत्तेत आला. विशेष म्हणजे या सत्तापालटमुळे शिवसेना पक्षाची मोठी हानी झालीय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांसोबत बंडखोरी केली. विशेष म्हणजे संबंधित घटना ताजी असतानाच भाजपने आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने आज दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्यांदा भेट घेतलीय. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज राज्यात फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय.

याआधी बबनदादा शिंदे यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी राजन पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना कारखान्याच्या कामानिमित्ताने भेट घेतल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज बबनदादा शिंदे यांनी दुसऱ्यांदा फडणवीसांची भेट घेतलीय.

हे सुद्धा वाचा

बबनदादा शिंदेंनी सांगितलं भेटीमागचं कारण

दरम्यान, बबनदाद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात ही बैठक होती. या बैठकीला आमदार-खासदार उपस्थित होते, अशी प्रतिक्रिया बबनदादा शिंदे यांनी दिली.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद?

बबनदादा यांनी सर्वपक्षीय बैठकीचं कारण दिलं असलं तरी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात धुसफूस असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सोलापुरात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अधिकृत अशी कुणाकडूनही माहिती देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी राजन पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत वाद कोणत्या पक्षात नसतो, अशी भूमिका मांडली होती.