Navratri Special | पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला 30 प्रकारच्या दागिन्यांचा साज, पारंपरिक पोशाखात सावळ्या विठुरायाचेही रूप खुलले
राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही नवरात्रीच्या निमित्ताने आज नवव्या दिवशी रुक्मिणीमातेला 30 प्रकारच्या दागिन्यांचा साज घालून पसरती बैठकीत पूजा बांधण्यात आली.
पंढरपूर | 23 ऑक्टोबर 2023 : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त आज नवव्या दिवशी रुक्मिणीमातेला 30 प्रकारच्या दागिन्यांचा साज घालून पसरती बैठकीत पूजा बांधण्यात आली. तर पारंपरिक दागिने आणि पोशाखात सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत होते. नवरात्री निमित्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध अलंकार आणि वेगवेगळ्या रूपात रुक्मिणी मातेस सजवतात. तसेच श्री विठ्ठलासही पारंपरिक, पेशवेकालीन दागिन्यानी सजवतात. आज नवव्या दिवशी रुक्मिणी मातेची पसरत्या बैठकीच्या रूपात पूजा करण्यात आली.
देवीला 30 प्रकारच्या आकर्षक दागिन्यानी सजवले होते. यामध्ये नवरत्नांचा हार, हिऱ्यांचे दागिने, बाजू बंद, सरी, पैंजण, तारमंडळ, पुतळ्याची माळ, चंद्र हार, पाचू हार, मासोळी , टोप अशा सर्व दागिन्यांनी देवीचे रूप मनमोहक दिसत होते.