पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे कायम केले, त्यांचे आडनाव आगलावे करा; सदाभाऊंची सडकून टीका
सदाभाऊ म्हणाले की, शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे. शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले.
सोलापूरः शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले. त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी जहरी टीका रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते. सदाभाऊ म्हणाले की, शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे. शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. सध्या सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते आज शेतकरी मेळाव्याला हजर राहणार आहेत. त्यापू्र्वीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आता याला राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) कोण प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून टीका…
सदाभाऊ खोत यांनी यापू्र्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंतप्रधान पदावरूनही टीका केली होती. पवार म्हणाले होते की, रशिया आणि युक्रेन संघर्ष सुरू आहे. तेथील विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आहे. तेथे आपली हजारो मुले आहेत. आठ- आठ दिवसांपासून ते भुयारात बसलेत, बाहेर पडता येत नाही. केंद्र सरकारने काही पावले टाकली आहेत. तेथे आम्ही सोबत आहोत. तेथे आम्ही राजकारण आणणार नाहीत. तेथील मुलांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. संकट येईल तेव्हा राजकारण आणायचे नाही, असे आवाहनही त्यांनी केले होते. यावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर ट्वीट करून फडणवीसांच्या संदर्भाचा आधार घेत टीका केली होती. ते म्हणाले होते की, शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना मी येऊ दिलं नाही. मात्र, येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच.
आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा…
सध्या येणाऱ्या काही दिवसांत राज्यातल्या महत्त्वाच्या अशा महापालिका निवडणुका आहेत. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मालेगावसह इतर महापालिकांचा समावेश आहे. शिवाय येणाऱ्या काळात जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. या दोन्ही निवडणुका सोबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे आरोप-प्रत्यारोप होतायत. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळात यात रंगतच येणार आहे.
इतर बातम्याः