सकाळी बँक उघडताच लॅपटॉपमधून धूर, कागदपत्रांची राख, या बँकेत काय घडलं? चोरट्यांना नेमकं काय हवं होतं?
शिवाजीनगर भागातील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील या प्रकाराविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर सुरवसे, सोलापूर : बार्शी (Barshi) येथील बँकेतून आज धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Bank) कर्मचारी सकाळी रोजच्या कार्यालयीन वेळेला बँकेत पोहोचले, तेव्हा समोरील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. बँकेच शटर उचकटून कुणीतरी आत शिरलं होतं. आत जाऊन पाहिलं तर लॅपटॉपमधून धूर येत होता. तर अर्ध्याच्या वर कागदपत्र जळून खाक झाली होती. बँकेवर दरोडा टाकण्याचा हा प्रकार असावा, हे लक्षात आल्यानं कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुढील तपास केला असता इथली फक्त १० हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाल्याचं निदर्शनास आलं.
कधी घडली घटना?
पोलिसांच्या अंदाजानुसार, बार्शी येथील शिवाजी नगर परिसरात ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँक फोडून बँकेचे महत्त्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप जाळण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी किती रक्कम पळवून नेली, याचा तपास करण्यात आला. मात्र बँकेतून फक्त १० हजार रक्कमच चोरट्यांनी पळवल्याचं दिसून आलं.
रागातून जाळले लॅपटॉप?
पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या चोरट्यांना बँकेच्या मुख्य तिजोरीवर आणि सोने-चांदीच्या दागदागिन्यांवर डल्ला मारायचा होता. बँकेत ज्या ठिकाणी सोन्याचे दागिने ठेवलेले असतात, त्या लॉकरपर्यंत चोरटे गेले. ते उघडण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र चोरट्यांना त्यात यश आलं नाही. त्यामुळेच रागाच्या भरात त्यांनी बँकेतील संगणक तसेच लॅपटॉप जाळून देण्याचा प्रयत्न केला. बँकेतील महत्त्वाच्या कागदपत्रांनाही अज्ञातांनी आग लावल्याचे दिसून आले. बार्शी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
२८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजली आहे. शिवाजीनगर भागातील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील या प्रकाराविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी बँकेतून दहा हजार रुपयांची रक्कम नेली असली तरीही बँकेतील बहुतांश संपत्तीचं नुकसान करण्यात आलं. चोरट्यांनी लावलेल्या आगीत बँकेतील साहित्य, लॅपटॉप, काही मशीन्स जळून खाक जाल्याने बँकेचं सुमारे अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जात आहे.