काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात गटबाजी उघड, अखेर प्रणिती शिंदे यांना व्यक्त करावी लागली दिलगिरी, काय घडलं?
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा विजय झाला. या विजयानंतर आज पंढरपुरात काँग्रेसकडून कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पण या मेळाव्या अंतर्गत गटबाजी उघड झाली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. पण हेच यश कायम ठेवणं हे महाविकास आघासाठी महत्त्वाचं आव्हान आहे. विशेष म्हणजे हे यश संपादीत करण्याआधी महाविकास आघाडीला एकत्र राहण्याचं मोठं आव्हान आहे. कारण महाविकास आघाडीत काही घटना अशा घडत आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरुरचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी केलेले आरोपही गंभीर आहेत. या घटनेनंतर आता पंढरपुरात काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. या घटनांमुळे महाविकास आघाडी आणि तिच्या घटक पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न निर्माण होतोय.
पंढरपुरात नेमकं काय घडलं?
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा विजय झाला. या विजयानंतर आज पंढरपुरात काँग्रेसकडून कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पण या मेळाव्या अंतर्गत गटबाजी उघड झाली. प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर भगीरथ भालके यांचे छायाचित्र नसल्याने भालके समर्थकांची घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे हा प्रणिती शिंदे यांचा पहिलाच कृतज्ञता मिळावा होता. या मेळाव्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे उघड झाले.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर दिवंगत आमदार भारत भालके आणि त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे छायाचित्र नसल्याने भालके समर्थक आक्रमक झाले. संतप्त झालेल्या भालके समर्थकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर घोषणाबाजी करत गोंधळ घातला. हा गोंधळ इतका वाढला की, अखेर खासदार शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यानंतर भालके यांचे समर्थक कार्यकर्ते शांत झाले.
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा गंभीर आरोप
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील विजयानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्या मंचर येथे झालेल्या नागरी सत्कार समारंभात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ केला होता. याच पार्श्वभूमीवर आज मंचर येथे ठाकरे गटाचा विचार विनिमय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी महाविकास आघाडीच्या एकूणच कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला संपवण्याचे षडयंत्र सूरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.