वीजबिलमाफीवरून शेतकरी आक्रमक, सोलापुरातल्या शेतकऱ्यांचा सरकारला काय इशारा?
राज्यात अनेक ठिकाणी वीजतोडणीविरोधात आंदोलनं पाहायला मिळाली. आता सोलापुरातील शेतकरीही वीजतोडणीविरोधात आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील शेतकऱ्यांनी वीजबिल माफीसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले आहे.
वीजबिलावरून शेतकरी आक्रमक
Follow us on
सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजबिलावरून (Electricity bill) पुन्हा ठिणग्या उडत आहेत. एकिकडे महावितरण (MSEB) तोट्यात आहेत म्हणत सरकार वीजतोडणी करत आहे. तर दुसरीकडे हातातोंडाला आलेली पिकं करपून जात असल्याने बळीराजा (Farmers) टाहो फोडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वीजतोडणीविरोधात आंदोलनं पाहायला मिळाली. आता सोलापुरातील शेतकरीही वीजतोडणीविरोधात आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील शेतकऱ्यांनी वीजबिल माफीसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले आहे. सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होत आंदोलन करताना दिसून आले. या संघटनेने मोर्चा काढत MSEB च्या अधिक्षक अभियंतांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. आता महावितरण आणि ऊर्जा विभाग यातून काय तोडगा काढणार? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली होती. त्यामुळे सोलापूर येथे छत्रपति शिवाजी महाराज चौकापासून ते महावितरण कार्यालयापर्यंत जवळपास दोनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र एवढा पोलिस बंदोबस्त असुनही जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने सोलापूर येथील महावितरणच्या कार्यालयाच्या मागच्या गेटवरून उड्या मारून, हातात रुमणे घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोलापूर येथील कार्यालयाच्या समोर जाऊन घोषणाबाजी केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
दरम्यान जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, रात्रीची चालू असलेली लाईट बंद करून दिवसाची पूर्ण क्षमतेने आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवून शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवावा, अतिवृष्टी काळातील व महापूर काळातील मोटारीचे चाक फिरलेलं नसताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बनावट वीजबिल लादले आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत. सक्तीची वीजबिल वसुली थांबवून खंडित केलेला वीजपुरवठा त्वरीत सुरू करावा आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे व बागांचे होणारे नुकसान थांबवावे तसेच मुक्या जनावरांचे हाल थांबवावे अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.