जगाचा पोशिंदाच उपाशी; कलिंगडाला मिळाला फक्त 80 पैसे प्रति किलोचा भाव…
सोलापूर जिल्ह्यातील रामभाऊ रोडगे यांनीही शेतमालातून आपल्यालाही काही तरी फायदा होईल यासाठी कलिंगड पिकाची लागवड केली होती, मात्र विक्री करण्यात आली त्यावेळी कवडीमोल दराने घेण्यात आले.
सोलापूर : गेल्या महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे येथील शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पावसात आलेल्या पिकं सापडल्याने शेतमालाला बाजारातही कवडीमोल दर मिळू लागला. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतीवर नांगर फिरवला. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरं सोडून पीक उद् ध्वस्त केले. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातही घडला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडला मोठी मागणी असते.
त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्याच्या आधी कलिंगड पीक घेतात. मात्र यावर्षी कलिंगड पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील रामभाऊ रोडगे यांनीही शेतमालातून आपल्यालाही काही तरी फायदा होईल यासाठी कलिंगड पिकाची लागवड केली.
मात्र त्यातून फायदा होण्याऐवजी त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. कलिंगड पिकासाठी जेवढे खर्च केला गेला होता, तेवढाही खर्च कलिंगड पिकातून निघाला नाही.
कांद्यानंतर कलिंगडाचा दर कोसळला असून करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला तीन क्विंटल कलिंगड विक्रीनंतर अवघे 3 हजार 400 रुपये मिळाले आहेत. त्यामुळे कलिंगडाला केवळ 80 पैसे प्रति किलो भाव मिळाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला पैसे मिळणे सोडा उलट 4560 रुपये पदरचे पैसे खर्च करून त्यांना घरी परतावे लागले आहे. रामभाऊ रोडगे यांची करमाळ्यात तीन एकर शेती असून यात त्यांनी दोन एकरमध्ये कलिंगडची लागवड केली आहे. त्यांना यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
उत्पादन झाल्यानंतर त्यांनी यातील तीन टन कलिंगड विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. हे तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे 4 हजार 500 रुपये, हमाली 960 रुपये, असा एकूण 7 हजार 960 रुपये खर्च आला.
या कलिंगडाला दर मात्र 3400 रुपये मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्च तर मिळालाच नाही याउलट नुकसान सोसून घरी परतावे लागले आहे.