Solapur Vidya Chavan : राज ठाकरे भरकटलेले नेते, त्यांना कधीच शरद पवार होता येणार नाही; विद्या चव्हाण यांची सोलापुरात टीका
भगवी वस्त्रे घातली म्हणजे आपल्यालाही मते मिळतील, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे हनुमान चालीसा अन् भोंगे तसेच धर्माच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा त्यांनी चांगले काम करावे, यश नक्की मिळेल, असे टोले विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांना लगावले.
सोलापूर : राज ठाकरे हे भरकटलेले नेते आहेत, त्यांना कधीही शरद पवार (Sharad Pawar) होता येणार नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केली आहे. त्या सोलापुरात बोलत होत्या. राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. सभेची सुरुवातच त्यांनी शरद पवार यांना टोला लगावत केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विद्या चव्हाण यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे. शरद पवार समजून घेण्यासाठी अगोदर त्यांची 4-5 पुस्तके वाचा. शरद पवारांवर टीका करून अनेक नेते मोठे झाले आहेत, असे टोले त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावले आहेत. तसेच कुठे गेली त्यांची ब्लू प्रिंट, ज्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचा विकास करणार होते, असा सवालदेखील विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांना लगावत ब्लू प्रिंटची आठवण करून दिली.
‘टीका करणे सोपे असते’
राज यांच्या मनात राज्याविषयी निश्चित तळमळ आहे. ते चांगले वक्ते आहेत. त्यांच्याकडे व्हिजन आहे. मात्र ते सध्या भरकटल्यासारखे करत आहेत, असे निरीक्षण विद्या चव्हाण यांनी नोंदवले. शरद पवार होण्यासाठी झपाटून काम करावे लागते. तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून घेऊन मागील 50-55 वर्षांपासून सातत्याने काम करणारे शरद पवार हे नेते आहेत. त्या अनुभवातून ते शिकले. राज ठाकरेंनीही असेच फिरावे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम करावे. शरद पवारांवर टीका करणे सोपे असते. पण त्यांनी जे काम केले आहे, तसे करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला तर त्यांनाही निश्चितच यश येईल, असा टोला त्यांनी राज यांना लगावला.
#Solapur : राज ठाकरे भरकटलेले नेते, त्यांना कधीच शरद पवार होता येणार नाही; विद्या चव्हाण यांची सोलापुरात टीका @RajThackeray @Vidyaspeaks #RajThackeray #vidyachavan #SharadPawar अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/cIqSairLmP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2022
‘ब्लू प्रिंट आणली होती, ती कुठे गेली?’
राज ठाकरे यांनी आधी ब्लू प्रिंट आणली होती, ती कुठे गेली? असा सवाल करत ब्लू प्रिंट बाजूला ठेवली आणि भगवी वस्त्रे धारण करून अयोध्येला जाण्याचे ठरवले पण आता त्यांना रोखण्यात आले. भगवी वस्त्रे घातली म्हणजे आपल्यालाही मते मिळतील, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे हनुमान चालीसा अन् भोंगे तसेच धर्माच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा त्यांनी चांगले काम करावे, यश नक्की मिळेल, असे वक्तव्य केले.