असे भाऊ नसलेलेच बरे… सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं विधान; कुणाबद्दल म्हणाल्या असं?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन विविध नेतेमंडळींकडून वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. अशाच दोन आमदारांच्या वक्तव्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोलापूरच्या सभेत समाचार घेतला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.
“तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे पैसे घेऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. 1500 रुपयात बहीण-भावाचे नाते विकत घ्यायला निघाले. एवढे मोठे झाले. तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्याच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
“भाजपचे काही नेते येऊन आम्हाला एनसीपी म्हणजेच नॅचरली करप्ट पार्टी असे म्हणाले होते. मग आता त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेला पक्ष एनसीपी आहे. मग आता करप्ट पार्टी कोण आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. मात्र आता ते सोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
‘ED नसती लावली तर…’
“समृद्धी महामार्गावर एवढं मोठं भगदाड कसं काय पडलं? देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग निर्माण केला आहे. दौंडला 160 ट्रेन थांबत होत्या. मात्र आता फक्त 60 ट्रेन थांबतात. मग विकास नक्की कोणासाठी करताय? देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी दोन पक्ष फोडून आलो. अरे तुम्ही कॉपी करून पास झाले. ते दोन्ही पक्ष प्रेमाने नाही आले. तर ED लावली म्हणून तुमच्यासोबत गेले. ED नसती लावली तर एकजण पण तुमच्यासोबत आला नसता”, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
‘हे केवळ जुमलेबाज आणि खोटं बोलणारे सरकार’
“धनगर समाजाला आमच्या घराबाहेर म्हणाले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो. दहा वर्ष झाले. त्यांनी धनगर आरक्षण दिले का? हे केवळ जुमलेबाज आणि खोटं बोलणारे सरकार आहे. हे दिल्ली समोर झुकणारे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला असे सरकार नकोय”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “सत्ताधाऱ्यांनी राज्यातील कुठल्याही महिलेला आम्हाला मतदान केले नाही म्हणून त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. “मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्हाला शरद पावरांना संपवायचे आहे. पण महाराष्ट्रातील जनता शरद पवारांसोबत आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने संपणार नाहीत”, असंदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.