सोलापूर – अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) कुलगुरू मृणालिनी फडणवीस (Mrunalini Fadnvis) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचचे सदस्य आणि सिनेट सदस्यांनी राज्यपालांकडे (Governor) केली आहे. त्याचबरोबर कुलगुरू फडणवीस यांनी नियमबाह्यपणे टेंडर दिल्याने त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी आहे. सिनेट सदस्यांनी हे निवेदन राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. मुंबईत राजभवनावर विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी भेट घेऊन हे निवेदन दिल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.
कार्यशैली व प्रशासकीय कारभारातील पारदर्शकता याबाबत शंका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची कार्यशैली व प्रशासकीय कारभारातील पारदर्शकता याबाबत शंका आहे. त्यामुळे विद्यापीठ विकास मंचच्या शिष्टमंडळाने कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन तक्रार मांडली. राजभवन येथे बुधवारी शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदनही दिले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य अश्विनी चव्हाण, ॲड. नीता मंकणी, प्राचार्य बी. पी. रोंगे, अधिसभा सदस्य ॲड. अमोल कळके, प्राचार्य गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, प्रो. महेश माने सहभागी होते. निवेदनात म्हटले की, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सदस्यांवर आकसबुद्धीने कारवाईचा प्रयत्न केला आहे. लाखो रुपयांची अवाजवी कामे विद्यापीठ फंडातून केली जात आहेत. परीक्षेत गुण वाढवून दिल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतल्यावरून प्राधिकरणावरील पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला व सदस्यत्व पूवर्वत राहिले. विद्यापीठाला विविध प्रकरणात उच्च न्यायालयाने नोटिसा देखील बजावल्या आहेत.
परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात स्वत:च चौकशी समिती स्थापन करून स्वत:ला निर्दोष घोषित केले
ऑनलाइन परीक्षेचा प्रति पेपर दर इतर विद्यापीठात १० ते १५ रुपये इतका असताना विद्यापीठाने ३५ रुपये प्रति पेपर दर व ई टेंडर प्रक्रिया न राबविता दिला. खरेदी समितीची शिफारस व व्यवस्थापन परिषदेची मान्यता न घेता विद्यापीठ फंडातून वाहने खरेदी करण्यात आली. परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात स्वत:च चौकशी समिती स्थापन करून स्वत:ला निर्दोष घोषित केले. विद्यापीठाच्या रंगकामाबाबत टेंडर प्रक्रिया राबविली नाही. कामाचे सोयीस्कर तुकडे पाडून कामे करून घेतली जात आहेत असा आरोप कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यावरती करण्यात आला आहे.
राज्यपाल लवकरच यावर योग्य तो निर्णय घेतील
15 मार्च रोजी अधिसभेच्या सदस्यांनी विद्यापीठाचे अंदाजपत्रक नामंजूर केले. याचीही चर्चा राज्यपाल भवनात झाली. बजेटची प्रत केवळ दोन दिवस आधी मिळाली. अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. चर्चा न करता व्यवस्थापन परिषदेत अंदाजपत्रक मंजूर करून घेतले. सिनेट सभागृहात आक्षेपांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे बजेट नामंजूर झाले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विश्वास गमावल्यामुळे राजीनामा द्यावा, त्यांची चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. सिनेट सभागृहात बजेट सादर झाल्यानंतर ते मान्य अथवा दुरुस्तीसह मंजूर करणे अपेक्षित असते. सिनेट सभागृहात काही सदस्यांनी मुद्दाम दिशाभूल करून बजेट नामंजूर करण्याचा प्रयत्न केला. याबाबत राज्यपाल लवकरच यावर योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.