सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात धूमाकूळ घातला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच द्राक्ष पिकांच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिरवळ गावामध्ये गारपिटीमुळे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तुफान झालेल्या गारपिटीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ गावातील शेतकऱ्यांच्या द्राक्षे बाग जमीनदोस्त झाल्या आहेत. द्राक्षांच्या हंगामामध्येच बाग जमिनदोस्त झाल्यामुळे मोठा फटका बसला आहे.
शिरवळ गावातील मल्लिनाथ भासगे यांची दोन एकर द्राक्ष बाग या अवकाळी पावसामुळे भूईसपाट झाल्याने द्राक्ष पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.पावसात कोसळलेल्या बागेचे जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यातच शासकीय कर्मचारी संपावर असल्याने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार की नाही असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.
या अवकाळी आणि गारपिटीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळणार की नाही या चिंतेत आता शेतकरी आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव परिसरातील दर्शनाळ, पितापूर, डोंबरजवळगे, हन्नूर, धोत्री, अरळी, नन्हेगाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे काढणीस तयार असलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सदलापूर, किणी, बोरेगाव आदी ठिकाणी गारपिटीने आंबा, द्राक्ष पिकांचेही प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून असते पण काढणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे वर्षभर गुजराण कसे करायचे याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे.