कोण कोणत्या पक्षाचा म्हणून विचार करायचा नसतो, सुशीलकुमार शिंदे असं का म्हणालेत
मंत्रिमंडळात काय होते काय नाही हे मला माहिती आहे, असंही काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
सोलापूर : सोलापुरातील गुरव समाज अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापुरात आले. याबद्दल दोघांचे सोलापूरकरांच्या वतीने स्वागत करतो. हे सगळे आपलीच माणसं आहेत. पक्ष वगैरे काही नसते. गुरव समाजाच्या मागण्यांसाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र येतात, याचं मला आश्चर्य वाटलं. गुरव समाजासारख्या खेड्यातील जीवन जगणाऱ्या माणसांसाठी हे दोघे आले याचे आश्चर्य वाटले.
गुरव समाज हे देवाची पूजा करतात. भक्तांची आणि देवांची भेट घडवून देणारा हा समाज आहे. भक्त आणि देव यांच्यातील दुवा जर का उपाशी राहिला तर नैवेद्य कोण खाणार? तो नैवेद्य त्यांना अद्याप मिळालेला नाही. आमच्याही (काँग्रेसच्या काळात) काळात मिळाला नाही. एकनाथराव वगैरे सगळे आमचेच आहेत. त्यामुळे टाळ्या वाजवायची गरज नाही.
देवेंद्र फडणीस यांनी एकदा सुरुवात केली की ते द्यायलाच पाहिजे हो. देवेंद्र फडणवीस यांचे काम मी जवळून पाहिले आहे. गुरव समाजाचे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवा. गुरव समाजाची महामंडळाचे मागणी त्याबाबत विचार करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
गुरव समाजाची महामंडळ स्थापन करण्याची मागणी आहे. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कारण मंत्रिमंडळात काय होते काय नाही हे मला माहिती आहे, असंही काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
खोलवर जाऊन ते प्रयत्न करतील. गुरव समाजाच्या प्रश्नांसाठी नागपूरवरून येथे आलात. आता यांना न्याय द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.