माढ्यात अखेर भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. धैर्यशील मोहिते पाटील 26 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर जेव्हा शरद पवार पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विजयसिंह मोहिते हजर होते. शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, शेकापच्या जयंत पाटलांसह इतर अनेक नेत्यांशी चर्चेनंतर मोहितेंनी थंब दाखवत दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत राहिली. लवकरच अकलूजमधल्या सभेत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील, शिंदेंच्या शिवसेनेचे करमाळ्यातील नेते नारायण पाटलांचा होणारा प्रवेश भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी धक्का आहे. तर भाजपच्या उमेदवारावर नाराज असलेले स्वतः रामराजे निंबाळकर आणि त्यांचे दोन्ही बंधूदेखील लवकर मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा सुरु आहे. तसं झाल्यास शरद पवारांकडून अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असेल.
मोहिते कुटुंबानं 2019 ला राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. मोहितेंच्या वर्चस्वामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर जिंकून आले. माळशिरसमधल्या भाजप आमदाराच्या विजयातही मोहितेंचा वाटा मोठा राहिला. मात्र नंतरच्या काळात भाजपकडून मोहिते अडगळीत पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यंदा मोहितेंचे पुतणे धैर्यशील मोहिते उमेदवारीसाठी इच्छूक होते. पण भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनाच तिकीट दिलं. तेव्हापासून मोहिते भाजप सोडण्याच्या चर्चा होत्या. मात्र भाजपचे आमदार असलेले विजयसिंहांचे पुत्र रणजितसिंह मोहिते भाजपात थांबावं, यासाठी आग्रही होते. पण विजयसिंह, त्यांचे बंधू जयसिंह आणि पुतणे धैर्यशील मोहिते भाजप सोडण्यावर ठाम होते.
विजयसिंह मोहिते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्रीपदं भूषवली आहेत. जनसंपर्क आणि कामांमुळे माढा मतदारसंघात मोहितेंना माननारा मोठा वर्ग आहे. 2009 च्या लोकसभेत स्वतः शरद पवार माढ्यात 3 लाखांहून जास्त मतांनी जिंकून आले. 2014 च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते माढ्यातून राष्ट्रवादीचे खासदार झाले. आणि 2019 ला भाजप प्रवेशानंतर भाजपचा खासदार निवडून आणण्यातही मोहितेंचा रोल मोठा राहिला.
या घडीला भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढा, करमाळ्यातून अजित पवार गटाच्य शिंदें बंधूंचा पाठिंबा आहे. मान-खटावचे आमदार जयकुमार गोरे सोबत आहेत. दुसरीकडे सांगोल्यातील शेकापचं देशमुख कुटुंब मोहितेंच्या सोबत आहे. करमाळ्यातून नारायण पाटलांनी पाठिंबा दिलाय. फलटणमधून अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर मोहितेंसोबतच राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मोहितेंचे कारखाने, शिक्षण संस्थांचं जाळं असल्यानं मध्यंतरी कारवायांच्या भीतीनं त्यांचा प्रवेश लांबल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्या सर्व चर्चांना जयसिंह मोहितेंनी खोटं ठरवलंय. 2019 ला मोहितेंनी साथ सोडल्यानंतर माढा मतदारसंघात कमळ फुललं. त्यावेळी बदललेली समीकरण भाजपला अनुकूल ठरली. 2024 ला मोहिते पुन्हा पवारांकडे परतले आहेत, राज्यातलं समीकरणही बदललंय. त्यामुळे यंदा माढ्यात काय होणार? हे पाहणं महत्वाचं असेल.