देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मनोज जरांगे यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; म्हणाले, आम्ही त्यांचं स्वागत…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मंगळवारपर्यंत फडणवीस आरक्षणाचा तिढा सोडवतील असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यावर बोलताना त्यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारपर्यंत आरक्षणाचा तिढा सोडवतील, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मंगळवारपर्यंत हा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षणाचा तिढा सोडवतील, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं. मनोज जरांगे पाटील यांनी देखील या भेटीवरून सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता या भेटीबाबत बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुरेश धस यांच्यावर आमचा मोठा विश्वास होता, त्यांच्यावर दबाव असल्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पूर्वी चांगले होते, ते ऐकायचे, परंतु आता ते कोणाचं ऐकतात हे लक्षात येत नाही. त्यांना सांगणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. माणसं मागं घेऊन फिरणारा मी नाही. मी मराठा समाजासाठी काम करतो. यापूर्वीही माझ्या पाठीमागे मराठा समाज होता, आताही आहे. कोणी जर म्हणत असेल माझ्या मागे लोक नाहीत तर त्याने मला काहीही फरक पडत नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अजितदादा म्हणाले होते मी राजीनामा दिला होता, मग धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवालही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.