नांदेड, यशपाल भोसले, प्रतिनिधी : भाजपकडून आज विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. 99 पैकी एकूण 13 विधानसभेच्या जागांवर पक्षाकडून महिलांना संंधी देण्यात आली आहे. यामध्ये भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आता श्रीजया चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाल्या श्रीजया चव्हाण?
पन्नास वर्षांपासून आमचं कुटुंब लोकांची सेवा करत आहे, आमची परंपरा आहे. पक्षाने संधी दिली आहे, आई वडिलांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. त्यांच्या प्रेरणेतूनच मला लोकांची सेवा करायची आहे. सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या, महिला, तरुण, शेतकरी यांचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. आम्ही चांगल्या एटीट्यूडने पुढे चालत आहोत. मतदारसंघात चांगलं वातावरण आहे ,निवडणुक होईपर्यंत असंच वातावरण ठेवायचं आहे.
भोकर मतदारसंघाचा आमच्यावर आणी आमचा मतदारसंघावर विश्वास आहे. एक नविन चेहरा आहे, नविन नेतृत्व आहे, माझं कुटुंब तर आहेच पण माझी देखील एक व्यक्ती म्हणून वेगळी ओळख आहे. म्हणून लोकांनी मला मतदान करावं अशी प्रतिक्रिया यावेळी श्रीयजा चव्हाण यांनी दिली आहे.
तेरा जागांवर महिलांना संधी
भाजपकडून आज विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये 99 जणांचा समावेश आहे. 99 पैकी तेरा विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये चिखली मतदारसंघातून श्वेता विद्याधर महाले, भोकरमधून भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, फुलंब्रीमधून अनुराधाबाई अतुल चव्हाण नाशिक पश्चिम सीमाताई महेश हिरे, कल्याण पूर्व सुलभा गायकवाड, बेलापूर मंदा म्हात्रे दहिसर मनिषा चौधरी, गोरेगाव विद्या ठाकूर, पर्वती – माधुरी सतिश मिसाळ, शेवगाव मोनिका राजीव राजळे, श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते आणि केजमधून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे.