St workers strike : मेस्माच्या संकेतानंतर एसटी कर्मचारी आणखी आक्रमक, आंदोलन तीव्र, संपावर ठाम
अनिल परब यांना मेस्मा लावा नाहीतर चष्मा लावा पण आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा टोला एसटी कर्मचारी महिलांनी लगावला आहे. कर्मचाऱ्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्यांचा आधार घेत सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले आहे.
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणावर ठाम राहत आंदोलन आणि संप सुरूच ठेवला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने निलंबित केले आहे, त्याचबरोबर बडतर्फीच्या नोटीसही बजावल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली, पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचारी आज एकत्र येऊन सासणे ग्राऊंडवर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना कर्मचारी शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचार्यांनी घेतला आहे.
मेस्मा लावा नाहीतर चष्मा लावा
अनिल परब यांना मेस्मा लावा नाहीतर चष्मा लावा पण आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा टोला एसटी कर्मचारी महिलांनी लगावला आहे. कर्मचाऱ्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्यांचा आधार घेत सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले आहे. राज्यांमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री, परिवहन मंत्री शिवसेनेचा पण तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळेना. बाळासाहेब ठाकरे असते तर आम्हाला न्याय मिळाला असता असेही एसटी कर्मचारी म्हणाले.
सांगलीतल्या एसटी कर्मचाऱ्यांचं परबांना प्रत्युत्तर
मेस्माच्या संकेतानंतरही सांगलीतील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मेस्माचा मुहूर्त काढण्यापेक्षा विनिकरणाचा मुहूर्त काढा, अशी मागणी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सरकारने महिन्यात चार वेळा अल्टीमेट दिला, त्याला एसटी कर्मचारी घाबरणार नाहीत, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. तसेच कामगारांनी कामगारासाठी आंदोलन उभारले आहे. कोणत्या राजकीय पक्षाचे हे आंदोलन नाही. कुणाच्या सांगण्यावरून आम्ही आंदोलन करणार नाही असे प्रत्युत्तर त्यांनी अनिल परब यांना दिले आहे.