संजय राऊत फक्त शिवसेनेसाठी रोखठोक, आंदोलकांची भूमिका न घेणं लज्जास्पदः अॅड गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरीही हा लढा थांबणार नाही, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
मुंबईः आझाद मैदानावर आज एसटी महामंडळाच्या वतीने हायकोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadawarte) यांनी पहिली पत्रकारपरिषद घेतली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाठींबा देणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (SadaBhau Khot) यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याचे चित्र दिसल्यानंतर सदावर्ते यांनी पत्रकार आणि आंदोलकांना संबोधून ही परिषद घेतली. यावेळी विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील. खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरीही हा लढा थांबणार नाही, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊत हे फक्त शिवसेनेसाठी रोखठोक, हे लज्जास्पद!
एसटी महामंडळाच्या कर्मचारी आंदोलनात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी शिवसेनेचे खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे असे ते म्हणाले. तसेच संजय राऊत हे माझे मित्र आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. इथे घडलेले विद्यार्थी कायम तठस्थतेची भूमिका घेतात. मात्र संजय राऊत यांची सध्याची भूमिका लज्जास्पद असल्याची टीका अॅड. सदावर्ते यांनी केली.
पडळकर, खोत आंदोलनातून ‘आझाद’
यावेळी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना आपण आझाद करत आहोत, असे म्हटले. तसेच आंदोलकांकडून त्यांनी सामुहिक शपथही घेतली. जोपर्यंत एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन होत नाही, तोपर्यंत मी सर्व कुटुंबासोबत या लढ्यात सामील होत आहे, अशी प्रतिज्ञा यावेळी त्यांनी आंदोलकांकडून घेतली.
आंदोलनाचं नेतृत्व बदलतंय, दिशा बदलतेय
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर हायकोर्टात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे गुणरत्न सदावर्ते यांनी अशा प्रकारची जाहीर पत्रकार परिषद घेण्यावरून हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळीच दिशा घेणार हे स्पष्ट झालंय. येत्या 20 डिसेंबर रोजी न्यायालयानं नेमलेल्या समितीचा अहवाल सादर होईल. तोपर्यंत या आंदोलनाला आणखी कोण-कोणते नेते मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.