पालघरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद चिघळला, उमेदवाराच्या घरावर दगडफेक, आणि…
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्याच्या एक दिवस आधीच पालघरमधील एका गावात एक अनपेक्षित घटना समोर आलीय.
जितेंद्र पाटील, पालघर : राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी नुकतंच मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पण या निवडणुकीचा निकाल लागण्याच्या एक दिवस आधीच पालघरमधील एका गावात एक अनपेक्षित घटना समोर आलीय. पालघरमध्ये एका ग्रामपंचायत निवडणुकीत मतादानासाठी उमेदवारी लढवलेल्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. घरावर दगडफेक करणाऱ्यांनी उमेदवाराच्या गाडीवरही दगडफेक केलीय. त्यामुळे गाडीचं प्रचंड नुकसान झालंय.
पालघरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद चिघळलाय. ग्रामपंचायत निवडणुकीतून पालघरमधील नानिवली येथे उमेदवाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आलीय.
रात्रीच्या सुमारास गाडीची तोडफोड करत 1 लाख 16 हजार रुपये रोख घेऊन काही इसम पसार झाल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
परिवर्तन पॅनलचे ग्रामपंचायत सदस्य योगेश जाधव यांच्या गाडीवर आणि घरावर ही दगडफेक करण्यात आलीय. या दगडफेकीत त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
ग्रामपंचायत निवडणुकीचा उद्या निकाल
राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकार पुरस्कृत उमेदवारांची निवड होते की महाविकास आघाडी बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी वाद झाल्याची देखील माहिती समोर आलीय. अर्थात त्यांची संख्या कमीय. पण अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असतात. पण तरीही अशा घटना अपवादात्मक परिस्थितीत घडतात आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाला गालबोट लागतं.
पालघरमधील घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरुय. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.