नगरमध्ये के के रेंज विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, सुजय विखेंचा राज्य सरकारवर निशाणा
लष्कराच्या के के रेंज विस्तारीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, आता यावरुन नगर जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे (Sujay Vikhe Patil on K K Range land acquisition).
अहमदनगर : लष्कराच्या के के रेंज विस्तारीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, आता यावरुन नगर जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार निलेश लंके यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर लंके यांनी जमीन अधिग्रहण करण्यासाठी स्थगिती मिळाल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला आहे (Sujay Vikhe Patil on K K Range land acquisition).
“के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर? याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे”, असं वक्तव्य विखेंनी केलं. त्यामुळे स्थानिकांच्या मनात संभ्रम वाढला आहे. के के रेंज विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण होणार की नाही? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
के के रेंज विस्ताराच्या मुद्दावरुन शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेऊन स्थानिकांच्या व्यथा मांडल्या होत्या. “अहमदनगर जिल्ह्यातील गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट आणि मेहनत करुन ते आपली उपजीविका करतात. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रकिया गेल्या काही काळापासून सुरु होती. मात्र आता के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप नाकारण्यात येत आहे”, असं पवारांनी सांगितलं होतं.
हेही वाचा : साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा मोठा निर्णय
दरम्यान, के के रेंज विस्तारीकरणावरुन सुजय विखे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. “राज्यात लोकनियुक्त सरकार नाही तर षडयंत्र सरकार आहे. या षडयंत्र सरकारकडून सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस मिळतील, असं मला वाटत नाही”, असा घणाघात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे (Sujay Vikhe Patil on K K Range land acquisition).
“राज्य सरकारमुळे भ्रमनिरास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आलं आहे. त्यांच्या या वर्षाच्या कामकाजाकडे पाहिले तर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. फक्त पत्रकार परिषदा, प्रवेश प्रक्रिया, घोषणाबाजी, नारळ फोडणे, फोटो काढणे एवढेच या सरकारचे काम आहे”, असा टोला सुजय विखेंनी लगावला.
संबंधित बातम्या :
पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीला