महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन लोकसभेत घमासान, सुप्रिया सुळे प्रचंड संतापल्या, लोकसभा अध्यक्षांचं अजब विधान, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणाविषयी लोकसभेत माहिती दिली. संबंधित प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष द्यावं, अशी विनंती त्यांनी केली.
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावरुन सुरु असलेलं राजकारणं आता शिगेला पोहोचत चाललं आहे. विशेष म्हणजे या घृणास्पद आणि घाणेरड्या राजकारणाचे पडसाद आज संसदेत देखील पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित प्रकरणाविषयी लोकसभेत माहिती दिली. संबंधित प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष द्यावं, अशी विनंती त्यांनी केली. कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्राच्या नागरिकांना मारहाण केली जातेय. त्यामुळे या प्रकरणावर केंद्र सरकारने लक्ष द्यावं, अशी कळकळीची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. त्यांच्या या मागणीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अजब विधान केलं. “तुमच्या कोणत्याही वक्तव्याची लोकसभेच्या रेकॉर्डवर नोंद होणार नाही. दोन राज्यांमध्ये केंद्र काय करणार? हे संसद आहे”, असं अजब विधान ओम बिर्ला यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सध्या सुनावणी सुरु आहे. पण या मुद्द्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले आहेत. त्याचेच पडसाद कर्नाटकच्या सीमेवर बघायला मिळत आहेत. सीमावादाच्या मुद्द्यावरुन वाढलेल्या तणावाचा मुद्दा आज सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला.
यावेळी भाजपकडून जोरदार प्रतिकार करण्यात आला. संबंधित विषय न्यायप्रविष्ट असल्याने आणि दोन राज्यांमधील प्रश्न असल्याने या विषयावर संसदेत चर्चा होऊ नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. पण सुप्रिया सुळे यांनी रोखठोकपणे आपलं म्हणणं मांडलं.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
“महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांत एक नवा प्रश्न उभा राहिलाय. आमच्या शेजारच्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही अभद्र बोलत आहेत. विशेष म्हणजे काल त्यांनी हद्दच पार केली’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
“कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्राचे नागरीक जात होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र सुरुय. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मारहाण करण्यात आलीय. हे चालणार नाही. मी गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करते की, त्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मुजोरी चालणार नाही”, असंदेखील त्या म्हणाल्या.
सुप्रिया यांच्या भूमिकेवर लोकसभा अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?
सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या भूमिकेवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भूमिका मांडली. “तुमच्या कुणाचंही वक्तव्याची नोंद होत नाहीय. कोणत्याच रेकॉर्डमध्ये तुमचं विधान जाणार नाही. हा संवेदनशील विषय आहे. विषय दोन राज्यांचा आहे. त्यामध्ये केंद्र काय करणार? दोन राज्यांमध्ये केंद्र काय करणार, हे संसद आहे”, असं मत त्यांनी मांडलं.