मोठी बातमी! सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, समोर आलं मोठं कारण
खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचं कारण देखील समोर आलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. एम्स रुग्णालयाच्या सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ आहे, तर इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही निवृत्तीचे वय ६५ करण्या विषयी त्यांनी या भेटीत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
बीड मधील सरपंच हत्याकांड प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बजरंग सोनावणे यांच्या भेटीनंतर लक्ष घातले होते. त्यानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. एम्स रुग्णालयाच्या सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ आहे, तर इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही निवृत्तीचे वय ६५ करण्या विषयी या भेटीत चर्चा झाली. मात्र तरी देखील या भेटीला राजकीय महत्त्व असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली, या संदर्भात देखील ट्विट करत राज्यातील या १६५ आश्रमशाळांना वेतनश्रेणी व शाळासंहिता मान्य करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘शाहु फुले आंबेडकर अनुसूचित जाती मुला-मुलींची निवासी शाळा योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयाने २०% अनुदान जाहिर केले आहे. या शाळांची अनेकवेळा तपासणी होऊन देखील अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे या शाळांवरील शिक्षक अनेक वर्षांपासून विनावेतन सेवा देत आहेत. या शाळांपैकी एक असणाऱ्या केळगाव, ता. केज येथील गजराम मुंडे निवासी शाळेत १८ वर्षांपासून विनाअनुदान सेवा देणारे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी नम्र विनंती आहे की, राज्यातील या १६५ आश्रमशाळांना वेतनश्रेणी व शाळासंहिता मान्य करण्यात यावी. तसेच स्व. धनंजय नागरगोजे यांच्या पत्नी राजकन्या धनंजय नागरगोजे यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे. यासोबतच शासनाने दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनुदानास पात्र व अंशतः अनुदानावरील खाजगी शाळांना जाहीर करण्यात आलेली २० % अनुदान व टप्पावाढीसही निधी उपलब्ध करून देऊन या अनुदानाची ही तात्काळ अंमलबजावणी करावी. धन्यवाद’ असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.