Beed : आमदार सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
सुरेश धस यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी ही तक्रार केली आहे. सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील देवस्थान , वक्फ बोर्ड त्याचप्रमाणे महार वतनाच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय.
भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी ही तक्रार केली आहे. सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील देवस्थान , वक्फ बोर्ड त्याचप्रमाणे महार वतनाच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. ही तक्रार ईडीच्या झोन 2 मध्ये दाखल करण्यात आली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत ही तक्रार राम खाडे यांनी दाखल केली आहे.
देवस्थान, वक्फ बोर्डाच्या जमीनी बळकावल्याचा आरोप
देवस्थान आणि वक्फ बोर्ड यांच्या जमिनी या प्रकार दोन मध्ये येतात. या जमिनी कोणाच्याही नावावर होत नाहीत. या जमिनी देवस्थानच्या नावावर असतात किंवा त्यानंतर त्या सरकारी होतात. मात्र, सुरेश धस यांनी या जमिनीचा पद्धतशीर व्यवहार केला आहे. सुमारे 450 एकर जमीन त्यांनी बळकावली आहे. त्याचे बेकायदेशीर फेरफार केले आहेत. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
खर्डा विठोबा देवस्थानची सुमारे 16 हेकटर 81 आर जमीन होती. ही इनाम जमीन होती. या जमिनीची देखभाल शंकर पुजारी करत होते. ते अविवाहित होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही जमीन सरकार दरबारी जमा होणे आवश्यक होते. मात्र तसे न होता, शंकर पुजारी यांचा मृत्यू झाल्यानंतर ही जमिन शंकर पुजारी यांचे वारस म्हणून जोशी कुटुंबातील सहा जणांनी दावा केला. हा दावा तलाठी अनारसे आणि मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगवाढ यांनी हा दावा दाखल करून घेतला. एवढंच नव्हे तर तो मान्य ही केला. दावा मान्य होताच दुसऱ्याच दिवशी जोशी कुटुंबीयांनी ही जमीन मनोज रत्नपारखी यांना विकली. रत्नपारखी हे सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहेत. यानंतर लगेचच रत्नपारखी यांनी ही जमीन सुरेश धस यांचे मेव्हणे रोहित जोशी यांना विकली. या जमिनीची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये असावी, हा सार्व व्यवहार संशयास्पद आहे. याची चौकशी व्हावी, असे तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्यामागे चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता आहे.