लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथ्या टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, नंदुरबारसह ११ जागांवर मतदान होत आहे. या मतदानापूर्वी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्याने काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा राजीनामा दिला. परंतु खान्देशात प्रभाव असणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी आता भाजपला पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांनी राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी आता भाजपला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे धोरण व देश हितासाठी आपण भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी आपल्यावर भाजपचा कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुरेशदादा जैन यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपाला आपला पाठिंबा दिला. तसेच भाजपला मतदान करावे असे आवाहन केले आहे. परंतु आपण कोणत्याच पक्षात जाणार नाही. जो चांगले काम करणार त्याला पाठिंबा देणार असल्याचे सुरेशदादा जैन यांनी म्हटले.
सुरेशदादा जैन यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, दादांनी चाळीस वर्षाचा राजकारणात कधीच स्क्रिप्ट वाचलेले नाही. त्याच्यांवर नक्कीच कोणाचा तरी दबाव आहे.
सुरेशदादा जैन यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरेशदादा जैन यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या निर्णयाचा महायुतीला नक्कीच फायदा होणार आहे. ते आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे चिन्ह असले तरी निवडून आले आहे. अपक्षही निवडून आले आहेत. सुरेशदादा अवलिया माणूस आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो दबावापोटी घेतला नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी यापुढे लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असणार. मात्र सुरेशदादा जैन यांचे मार्गदर्शन जिल्ह्याला आवश्यक आहे.