लोकसभेला कोण कुणाला धूळ चारणार? विविध सर्व्हेंचे आकडे काय-काय अंदाज वर्तवतात?
कोण किती जागा जिंकणार याच्या अंदाजाबाबत विविध काळात अनेक सर्व्हे समोर आले आहेत. मात्र या सर्व्हेंमधल्या आकड्यांची तफावत इतकी मोठी आहे, की ज्यामुळे अनेकजण संभ्रमात पडले आहेत.
संदीप जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 5 मार्च 2024 : विजयाचे दावे दोन्हीकडून होत असले तरी महाराष्ट्रात लोकसभेचं गणित काय असेल, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. कारण महाराष्ट्र स्थापनेनंतर इतिहासात पहिल्यांदाच अनोख्या समीकरणांनी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यात विविध कंपन्यांनी केलेल्या सर्व्हेंचे आकडे पाहिल्यास निकाल काय असेल, याबाबतच्या संभ्रमात अजून पर पडतेय. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना दोन गटात आहे. राष्ट्रवादीचेही दोन गट पडले आहेत आणि पहिल्यांदाच भाजप शिंदेंच्या शिवसेनेसह अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत लढणार आहे. तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असणार आहे. काही सर्व्हेंच्या मते यंदा महायुतीचं मविआवर वरचढ ठरेल. तर काही सर्व्हे सांगतायत की मविआ महायुतीच्या आव्हानाला रोखणार आहे. काही सर्व्हेत महायुतीचं पारडं जड आहे, तर काहींमध्ये मविआचं विशेष म्हणजे हे सर्व सर्व्हे काही दिवसांच्याच अंतरानं झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून जवळपास दर दीड महिन्यांनी एखादा सर्व्हे समोर आलाय, ज्यात कधी मविआला धक्का आहे, तर कधी महायुतीला.
अंदाजाचे आकडे काय आहेत?
30 जुलै 2023 ला सीएनएक्सचा सर्व्हे झाला, ज्यात महायुतीला 24, मविआला देखील 24 जागांचा अंदाज होता. त्याच्या फक्त 17 दिवसांनी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 ला ईटीजीचा सर्व्हे आला. त्यात महायुतीला 28 ते 32, आणि मविआला 15 ते 19 जागांचा अंदाज बांधण्यात आला. नंतर जवळपास सव्वा महिन्यांनी म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 ला सीएनएक्सचा सर्वे झाला. यात महायुतीला 28 तर मविआला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. नंतर 2 महिन्यांनी डिसेंबर 2023 मध्ये सी व्होटरचा सर्व्हे आला, ज्यात महायुतीला 19 ते 20 जागा, मविआला 26 ते 28 जागांचा अंदाज होता.
पुन्हा नंतरच्या 2 महिन्यात 8 फेब्रुवारीला टाईम्स नाऊच्या सर्व्हे आला. यात सर्व्हेत महायुतीला 39, तर मविआला 9 जागांचा अंदाज वर्तवला गेला. नंतरच्या 20 दिवसात म्हणजे 28 फेब्रुवारीला मॅट्रिझचा सर्व्हे आला, ज्यात महायुतीला 45 आणि मविआला 3 जागा दाखवल्या गेल्या. त्यानंतर फक्त 24 तासातच म्हणजे 29 फेब्रुवारीला इंडिया टीव्हीच्या सर्व्हे आला. यात महायुतीला 35 तर मविाला 13 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
महाराष्ट्रात विशेषतः अजित पवारांचा गट सत्तेत गेल्यानंतर विविध संस्थांनी केलेले हे सर्व्हे आहेत. गेल्या 8 महिन्यात ठळक 6 सर्व्हे झालेत. शेवटच्या दोन सर्व्हेमधलं अंतर फक्त 1 दिवसांचं आहे, मात्र आकड्यांच्या अंदाजांमधला फरक चक्रावून सोडणारा आहे. एका सर्व्हेचा अंदाज आहे की महायुती 45 तर मविआ 3 जागा जिंकेल. दुसरा सर्व्हे अंदाज सांगतोय की महायुती 20 तर मविआ 28 जागा जिंकणार.
महाराष्ट्रात भाजप नेते महायुतीचे ४५ हून जास्त खासदार जिंकण्याचा दावा करतायत. मविआनं अद्याप आकड्यांचं भाकीत वर्तवलेलं नाही. मात्र 45 हून अधिक खासदार जिंकणारच असं भाजपचे बावनकुळे म्हणतायत. तर उरलेल्या ३ जागा का सोडायच्या म्हणत शिंदेंच्या शिवसेनेच्या तानाजी सावंतांनी पूर्ण 48 च्या 48 जागांवर विजयाचा दावा केलाय.
सर्व्हेंना सॅम्पलच्या मर्यादा असतात. मात्र त्यातून लोकांचा कल कळत असल्याची धारणा आहे. मात्र यंदा महाराष्ट्राबाबत येणारे सर्व्हेदेखील परस्परविरोधी आहेत. त्यामुळे विविध संस्थांचे अंदाज अपना अपना असला, तरी लोकांचा अंदाज काय? याचं उत्तर निकालावेळीच मिळेल.