प्रसूतीसाठी 10 लाख मागितले, त्याच दीनानाथ रुग्णालयाला फक्त 1 रुपया किरायाने जमीन; सुषमा अंधारेंच्या ट्वीटची चर्चा!
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने महिलेच्या प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहेत.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. तनिषा सुशांत भिसे या महिलेच्या प्रसूतीसाठी तिच्या कुटुंबीयांना एकूण 10 लाख रुपये मागितले असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या महिलेचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू जाला आहे. मृत महिला ही भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी असल्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वार्षिक फक्त 1 रुपये भाड्याने जागा दिली आहे, असा गंभीर दावा केला आहे.
फक्त एक रुपया भाडे घेऊन जमीन दिल्याचा आरोप
हा दावा करताना सुषमा अंधारे यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यम खात्यावर एक फोटोही अपलोड केला आहे. या फोटोमध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख आहे. याच निर्णयात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाममात्र 1 रुपया भाडे घेऊन सरकारने रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली होती, असा आरोप केला आहे.
सुषमा अंधारे यांनी नेमका काय दावा केलाय?
सुषमा अंधारे यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयांचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. याशिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे, असे सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सांगण्यात आले आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला वार्षिक एक रुपया नाममात्र भाड्याने जमीन देण्याचा निर्णय… ! pic.twitter.com/cCnYmuHIcc
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 4, 2025
तसेच, या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 795 चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची ट्रस्टची मागणी होती. त्यानुसार ही जमीन वार्षिक 1 रुपया या नाममात्र दराने भाडेपट्टयाने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सुकर होईल, असे सुषमा अंधारे यांनी अपलोड केलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या फोटोमध्ये सांगण्यात आले आहे.
सुषमा अंधारे यांनी अपलोड केलेल्या फोटोमुळे आता सत्ताधारी महायुती सरकारला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.