ही भूमिपुत्रांची अवहेलना, देवेंद्र भुयार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारे यांची टीका
शेतकऱ्यांच्या मुलाच्या लग्नासंदर्भात आमदार देवेंद्र भुयारांनी चिड आणणारं वक्तव्य केलं आहे. मुलीच्या 3 कॅटेगरी करत, 3 नंबरच्या मुलींशीच शेतकऱ्याचं लग्न होतं असं भुयार म्हणाले आहेत. त्यानंतर भुयारांविरोधात संताप उमटला. मात्र आपलं हे वक्तव्य 2019मधलं मध्य प्रदेशातलं असल्याचं भुयारांनी म्हटलं आहे.
एक नंबर पोरीसाठी नोकरीवाला, 2 नंबरची पोरगी पान ठेलेवाला आणि किराणा दुकानवाल्याला तर 3 नंबरची पोरगी शेतकऱ्याच्या मुलाला असं वक्तव्य अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं आहे. त्यांनी थेट मुलींच्या कॅटेगरीच त्यांनी शोधून काढल्या आहेत. देवेंद्र भुयार आमदार आहेत आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठींबा दिलाय. स्वत: अजित पवार सध्या लाडकी बहीण योजनांचे जोरदार प्रचार करत आहेत. दुसरीकडे त्यांचेच समर्थक आमदारांच्या मुलींच्या 3 कॅटेगरी करुन, शेतकऱ्यांच्या गळ्यात 3 नंबरचा गाळ पडतो, अशी भाषा वापरत आहेत.
महिलांची कॅटेगरीचं करुन भुयार थांबले नाहीत. तर जन्माला येणाऱ्या मुलांबद्दलही आक्षेपार्ह टिप्पणी केली. 3 नंबरच्या मुलींशी लग्न केल्यावर, ती महिला म्हणजे माय इल्लू पिल्लू आणि तिच्या पोटी वाणराचं पिल्लू असं संतापजनक वक्तव्य भुयारांनी केलं आहे. महिलांबद्दल काय बोलावं, याचं तारतम्यही या आमदाराला नाही. सुषमा अंधारेंनी हा महिलाच नाही तर कृषीक्षेत्रात भूमिपुत्रांची अवहेलना असल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र भुयारचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना आणि कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारं तसंच शेतकऱ्यांची टिंगल उडवणारं आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
देवेंद्र भुयार अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर तत्कालीन कृषी मंत्री अनिल बोंडेंचा पराभव करुन भुयार जिंकले. मात्र नंतर अजित पवारांसोबत जवळीक वाढल्यानं आणि राजू शेट्टींसोबतच फिस्कटल्यानं स्वाभिमानीतून 2022मध्ये हकालपट्टी झाली. आता भुयारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
सार्वजनिकपणे कसं बोलावं हे किमान लोकप्रतिनिधी म्हणून भुयारांना माहिती असलं पाहिजे. कारण महिलांचं वर्गीकरण करुन, एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर…आणि डोंबड्या म्हणण्याचा अधिकार भुयारांना नाही. अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून उमटत आहेत.